Sana Khan : भाजपची नागपूर शहरातील महिला पदाधिकारी सना खान हिची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं आहे. सना खान हत्या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी अमित साहू याचा नोकर जितेंद्र गौड याला अटक केली आहे. त्याने सनाचा खून करून मृतदेह नदीत फेकल्याची कबुली नागपूर पोलिसांना दिली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
सना खान १ ऑगस्ट रोजी मध्यप्रदेशातील जबलपूर येथील मित्र अमित उर्फ पप्पू साहू याला भेटायला गेली होती. अमित हा सना खानचा व्यावसायिक पार्टनर असल्याची माहिती आहे. जबलपूरमध्ये गेल्यानंतर सना अमितच्या घरी मुक्कामी थांबली होती.
मात्र, २ ऑगस्टपासून सना खानचा फोन लागत नसल्याने तिच्या आईने बेपत्ता झाल्याची तक्रार नागपूर पोलिसांत दिली होती. दरम्यान, मानकापूर पोलिसांचे पथक सना खानचा शोध घेण्यासाठी जबलपूरला गेलं. पोलिसांनी अमित साहू याचा शोध घेतला.
मात्र, तो फरार झाला. अमित याच्या नोकरांनीही तेथून पळ काढला होता. शेवटी पोलिसांनी तांत्रिक आधारे अमितचा नोकर जीतेंद्र गौड याला अटक केली. त्याने अमितच्या कारच्या डिक्कीत रक्त सांडलेले होते.
ते रक्ताने माखलेली कारची डिक्की स्वच्छ केल्याची कबुली दिली. सना हिचा मृतदेह हिरन नदित फेकल्याचेही त्याने सांगितले. सना खान हत्याकांडाचे प्रकरण जबलपूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले असून तपास सुरू आहे. भाजप महिला पदाधिकाऱ्याच्या हत्येची बातमी कळताच नागपुरात खळबळ उडाली आहे.