राजेंद्र पाटील
जळगाव : गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा होत आहे. जिथे पटेल त्याठिकाणी उत्खनन केले जात असल्याने गिरणा नदी पात्राला खड्डेमय स्वरूप प्राप्त झाले आहे. नदी काठावरील गावातील लोकांना हे खड्डे जीवघेणे संकट ठरले आहे. प्रशासनाचा धाक राहिला नसल्याने गिरणा पात्राचे विद्रुपीकरण झपाट्याने होत असल्याचे विदारक चित्र जागोजागी पहायला मिळत आहे. ही बाब गंभीर तर आहेच पण यामुळे पर्यावरणाचा र्हासदेखील होत आहे. परंतु याबाबत उपाययोजना बाबतीत सर्वत्र उदासिनता दिसते.
गिरणा काठावर अनेक खेडे, गावे वसलेली आहेत. या लोकांना कामानिमित्त नदीपात्रातून ये-जा करावी लागते. पावसाळ्यात नदीला पाणी आलेले असते. त्यामुळे वाळू उपसाच्या खड्डयात मोठ्या प्रमाणात पाणी साचते तर पावसामुळे नदीपात्रात सर्व दूर पाणी पसरल्याने या खड्डयांचा अंदाज येत नाही. त्यातच वाळू ऐवजी गोटेच जास्त प्रमाणात असल्याने चालताना तोल जाऊन नदी पात्रात पडण्याची भिती असते. चुकून पाय घसरून व्यक्ती पडल्यास तो प्रकार जीवघेणा ठरतो. निरपराध व्यक्तींचा अशा खड्डयांनी जीव घेतल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये किंवा त्या टाळण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याची गरज आहे.मात्र त्याबाबत प्रशासकीय पातळीवर कारवाई गेल्याचे अजून तरी दिसून आलेले नाही. निरपराध व्यक्तींच्या मृत्यूने त्या कुटुंबाची यातायात होत असते, या जाणीवेतून या घटना रोखल्या गेल्या पाहिजेत.
ग्रामस्थांनी सतर्क रहाणे गरजेचे
नदी पात्रातील अप्रिय घटना टाळण्यासाठी ग्रामस्थांनीच सतर्क असणे गरजेचे आहे. नदीपात्रात खड्डयांमुळे निर्माण झालेली ही अवघड समस्या असून त्याकडे डोळसपणे पाहण्याची सवय सर्वांना करावीच लागणार आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहचा प्रश्न असो, शाळा महाविद्यालयात जाणारा विद्यार्थी असेल, शेतात जाणारा शेतकरी किंवा शेतमजूर असेल या सर्वांना नदी पात्रातून जाताना काळजी घ्यावीच लागेल. हीच सतर्कता जगण्याची वाट मोकळी करून देईल.
दहा दिवसात नदी पात्रात दुसरा बळी
पहिली घटना: रविवार ९ रोजी मधूकर बाबूराव भोई (६५) रा. आव्हाणे हे सकाळी गिरणा नदी ओलांडत शेतात जात होते. नदीपात्रात पाय घसरून तोल गेल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. मधूकर भोई हे शेतात कामासाठी जात असताना ही दुर्देवी घटना घडली. दुसरी घटना : मंगळवार १८ जुलै रोजी म्हसावद येथील तरूण किशोर श्रावण मराठे (४०) रा.खर्चीनगर हे गिरणानदीच्या काठावर हातपाय धुत असताना तोल जाऊन ते पाण्यात बुडाले.त्यांचा शोध घेण्यासाठी तब्बल पाच तासांचे शर्थीचे प्रयत्न करावे लागले.त्यानंतर मृतदेह हाती लागला.