---Advertisement---
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अत्यंत जवळचे, विधान परिषदेचे भाजपचे ज्येष्ठ आमदार आणि नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच त्यांनी हा निर्णय जाहीर केल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संदीप जोशी यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर भावनिक पत्र प्रसिद्ध करत आता मला थांबायचंय ! या निर्णयाची माहिती दिली. राजकारण हे कधीच पद, सत्ता किंवा प्रतिष्ठेसाठी नव्हते, तर निस्वार्थ सेवा आणि समर्पणाचा मार्ग होता, असे त्यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे.
सध्याच्या राजकारणात सत्तेसाठी होणारी पक्षांतरं, वाढलेली संधीसाधू वृत्ती आणि गळेकापू स्पर्धा यामुळे सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्तेही अस्वस्थ झाले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या परिस्थितीत सक्रिय राजकारणातून बाजूला होणे हाच योग्य निर्णय असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी जाहीर माफी मागितली :
संदीप जोशी यांनी घेतलेल्या या निर्णयासाठी त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर माफी मागितली आहे. पक्षाने दिलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, आता नवीन पिढीला संधी देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस यांना आपण हा निर्णय आधीच कळवून भूमिका समजावून सांगितल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पदाचा कार्यकाळ संपण्याआधी संदीप जोशींनी घेतला मोठा निर्णय :
सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य असलेल्या संदीप जोशी यांचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपणार आहे. तोपर्यंत दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, त्यानंतर कोणत्याही पदासाठी किंवा तिकिटासाठी आग्रह धरणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आणि भाजपमधील कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या संधींबद्दल त्यांनी अभिमानाने उल्लेख केला. त्यांच्या या निर्णयामुळे नागपूर भाजपच्या राजकारणात मोठ्या बदलांचे संकेत मिळत असल्याचे बोलले जात आहे.









