Sangli Murder News : सांगलीच्या कुपवाड्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्यातील मुलीची छेड काढणाऱ्या भाच्याची मामानेच निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. राहुल सूर्यवंशी ( वय 38) असं मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल होऊन, मामासह मुलाला अटक करण्यात आली आहे.
मयत राहुल सूर्यवंशी (वय 38, रा. येडूर मांजर, कर्नाटक ) हा कुपवाडच्या औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामाला होता.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून राहूल हा आपल्याच नात्यातील मुलीची छेड काढत होता. हा प्रकार पीडित मुलीने नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांनी राहूलला अनेक वेळा समजदेखील दिला. मात्र, राहूलने मुलीची छेड काढण्याचे बंद केले नाही. समज देऊनही राहूल सतत त्रास देत असल्यामुळे नातेवाईकांचादेखील राग अनावर झाला.
पुन्हा एकदा पीडित मुलीची छेड काढल्याचं नातेवाईकांना समजलं. सौरभ सावंत आणि राहुलचा मामा संदीप सावंत यांना राग अनावर झाला. त्यांनी थेट राहुलला पकडून मारहाण केली. यात संदीप सावंत याने लोखंडी रॉडने हल्ला केला. तर सौरभने तिथच असलेला दगड हातात घेऊन राहुलच्या डोक्यात घातला. दगड डोक्यात घालताच संशयित फरार झाले. डोक्यात दगड घातल्यामुळे राहुलचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी कुपवाड पोलिसांत गुन्हा दाखल झाला असू, आरोपी सौरभ सावंत आणि राहुलचा मामा संदीप सावंत दोघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.