Sanjay Rathod Accident । शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्या वाहनाला मध्यरात्री २ च्या सुमारास भीषण अपघात झाला. पोहरादेवीतून यवतमाळला जात असताना त्यांच्या गाडीने पिकअपला धडक दिली. या अपघातातून संजय राठोड सुदैवाने बचावले तर त्यांचा वाहनचालक सय्यद इस्माईल याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मात्र, राठोड यांच्या गाडीचा पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या ५ रोजी पोहरा देवीला भेट देणार आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड हे पोहरादेवी येथे होते. ते रात्री दोन ते अडीच वाजेदरम्यान पोहरादेवी येथून निघाले. पोहरादेवी येथून यवतमाळकडे जात असताना हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.
आर्णी येथील कोपरा गावाजवळ संजय राठोड यांच्या वाहनाने समोरच्या पिकअपला धडक दिली. या धडकेत पिकअप वाहनाचा चालक सय्यद इस्माईल याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या ५ रोजी पोहरागडमध्ये नंगारा संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. याच तयारीचा आढावा घेऊन संजय राठोड यवतमाळला परतत होते. तेव्हा दिग्रस-आर्णी मार्गावर असलेल्या कोपरा गावाजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की पिकअपच्या तसेच संजय राठोड यांच्या वाहनाची मोठी हानी झाली आहे.