संजय राऊत यांना जामीन मंजूर

मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अखेर विशेष पीएमएलए कोर्टाने शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात प्रवीण राऊत यांच्याशी संबंधित घोटाळ्यात सहभाग घेतल्याचा संजय राऊत यांच्यावर आरोप होता. याच प्रकरणात ईडीने अटकेची कारवाई केल्याने मागील १०२ दिवसांपासून ते तुरुंगात होते. मात्र अखेर आज कोर्टाने जामीन मंजूर केल्याने राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विशेष पीएमएलए कोर्टात संजय राऊत यांच्या निकालाबाबत सुनावणी झाली. निकाल जाहीर झाल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. मात्र खुद्द संजय राऊत यांना क्षणभर हा निकाल काय आहे, तेच समजलं नसल्याचं बोललं जातं. मात्र वकिलांनी त्यांना जामीन मंजूर झाल्याचं सांगितलं, त्यानतर ते भावनिक झाले. कोर्टात राऊत कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी त्यांनी माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास होता, असं सांगत आभार व्यक्त केले आणि आता मी पुन्हा लढेन, कामाला सुरुवात करेन, असा एल्गार केला.

राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर ठाकरे गटात आनंदाचं वातावरण असून आज संध्याकाळी ५ वाजता शिवसेना भवनात याचं सेलिब्रेशन होणार आहे. राऊतांच्या घराबाहेरही त्यांच्या स्वागतासाठी डीजे, फटाक्यांसह जय्यत तयारी करण्यात येत आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे अशा अनेक दिग्गजांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलं आहे.