पंतप्रधान मोदींवरील टीकेमुळे संजय राऊत अडचणीत

मुंबई : काही दिवसांपूर्वी एका सभेला संबोधित करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी औरंगजेबाच्या जन्मस्थानाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली होती. यानंतर उद्धव ठाकरे यांनीही एका सभेत बोलताना संजय राऊतांनी केलेल्या विधानाला एकप्रकारे पाठिंबा दर्शवत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला होता. याप्रकरणी भाजपाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून भाजपावर सडकून टीका केली जात आहे. संजय राऊत तर तोल सुटल्यासारखे बोलतांना दिसत आहे. मात्र राऊतांच्या या वादग्रस्त विधानांचा भाजपालाच फायदा होतांना दिसत आहे. मात्र पंतप्रधान मोदींवरील टीकेप्रकरणी भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला असून, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि गुजरातच्या नागरिकांची बिनशर्त माफी मागावी. तसेच संजय राऊत यांच्याविरोधात एफआयआर दाखल करावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. यासंदर्भात भाजपाने निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले आहे.