Maharashtra Politics : ‘संजय राऊत सडलेला आंबा’, मंत्री गुलाबराव पाटलांचा घणाघात

Maharashtra Politics : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत सतत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका करत आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वारंवार राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. नुकताच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना एका खळबळजनक दाव्याने खवळून टाकलं आहे.

संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटलं, “भाजपच्या गोटात चर्चा आहे की, कामाख्या देवीसमोर रेडे कापले गेले आणि त्यांची शिंग वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये पुरली आहेत. असं सांगणारा स्टाफ आणि त्याचे लोक आहेत.” त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून भाजप नेत्यांनी संतापाची प्रतिक्रिया दिली आहे.

गुलाबराव पाटलांचा जोरदार हल्लाबोल

संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा जोरदार समाचार घेत जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना “सडलेला आंबा” असे संबोधले आहे. त्यांनी टीका करताना म्हटलं,
संजय राऊतांना मुख्यमंत्री, शिंदे साहेबांशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. त्यांना फक्त शिंगंच दिसतात. पण ही तीच शिंगं आहेत, ज्यांनी गुवाहाटीला जाताना अंगावर घेतली होती. संजय राऊतांनी गंगेत जाऊन प्रायश्चित्त घ्यावं, म्हणजे त्यांच्या पापांची मुक्ती होईल. त्यांनी शिवसेना फोडण्याचं मोठं पाप केलं आहे. उद्धव ठाकरे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत नेलं, हा कोण भविष्यकार? संजय राऊत हा वेढा आहे. त्यांना चौकात आणून शिवसेना स्टाईलने उत्तर दिलं पाहिजे.”

महायुतीमधील पालकमंत्रिपदाचा तिढा कायम

दरम्यान, महायुती सरकारमध्ये अजूनही पालकमंत्रिपदाच्या वाटपाचा तिढा सुटलेला नाही. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून नाराजीनाट्य सुरू आहे. रायगडचे पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांना तर नाशिकचे पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांना देण्यात आले आहे. मात्र, या पदांसाठी शिवसेनेचे मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावलेही इच्छुक असल्याने हा तिढा अधिकच वाढला आहे.

पालकमंत्रिपद वाटपावरील नाराजीबाबत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “हा विषय थोडा क्लिष्ट असला तरी वरिष्ठ नेते आपापल्या पातळीवरून हा तिढा सोडवतील.”

संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यातील वाकयुद्धामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या संघर्षाचा काय परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.