संजय राऊतांचा भाजपाला फायदाच; असे का म्हणाले सुधीर मुनगंटीवार

मुंबई : भाजपासाठी मतदारांनी अनुकूल व्हावे, यासाठी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नवनवीन उपक्रम राबवत असतात. ज्या दिवशी काँग्रेससोबत जायचं असेल त्यादिवशी माझं दुकान बंद करेल, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. पण कधी कधी मला वाटतं, मतदारांनी आणि लोकांनी भाजपासाठी अनुकूल व्हावं, म्हणून कदाचित संजय राऊत नवनवीन प्रयोग करत असावे., अशी उपरोधिक टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना आज सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये संजय राऊत सहभागी झाले होते, यावर बोलतांना ते म्हणाले की, शिवसेनेकडून आम्हाला अपेक्षा होती. पण काही लोकांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या विरुद्धच वागायचं ठरवलं असेल तर काही उपयोग नाही.

सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मनात खदखद आहे, ती शब्दांच्या माध्यमातून ते चिडचिड व्यक्त करत आहे. सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरेंचे एकही भाषण नाही, ज्यामध्ये त्यांनी राज्यातल्या जनतेसाठी त्यांच्या काळात घेतलेला एखादा निर्णय सांगितला असेल. देवेंद्र फडणवीस म्हणतात, त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंकडे टोमणे बॉम्ब आहे. टोमणे मारणे हाच माजी मुख्यमंत्र्यांचा पराक्रम आहे. ठाकरेंची भाषा त्यानांच लखलाभ असो, असेही मुनगंटीवार म्हणाले.