मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील सरकार हे ना एकनाथ शिंदे, ना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी आणलंय, हे सरकार दिल्लीतून ईडीने आणले आहे. सीबीआयने, इन्कम टॅक्सने आणले आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
खासदार संजय राऊत म्हणाले की, शासकीय रुग्णालयातील मृत्यूची जबाबदारी सरकारची नाही का? कधी विचारावं तेव्हा मुख्यमंत्री कुठे आहेत तर दिल्लीत गेलेत, अमित शाहांना भेटायला गेलेत. मुख्यमंत्री महाराष्ट्र सदनात बसलेत. इथे कोण आहे? सरकार कोण चालवणार? या मृत्यूला जबाबदार कोण? देवेंद्र फडणवीस मदारी आहे आणि २ माकडं नाचयातेत. त्यांच्या हातात काय आहे? सरकारची नाडी दिल्लीला आहे त्यामुळे सारखे दिल्लीत जातात असं त्यांनी सांगितले.
राज्य सरकारची नाडी दिल्लीत आहे. ते कधीही खेचतात, ओढतात त्यानंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री पळत पळत दिल्लीत जातात. इथं सरकारी रुग्णालयात लोकं मरतायेत, गेल्या ८ दिवसांत १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. नागपूर, नांदेड, छ.संभाजीनगर इथं रुग्ण मृत्यूमुखी पडलेत. जितके लोक नक्षलवादी हल्ल्यात गेले नाहीत तितके शासकीय रुग्णालयात मेलेत असा संताप त्यांनी केला.
अजित पवार का पळून गेले हे शरद पवारांनी सांगितले. घाबरून पळाले ते. मुख्यमंत्री रात्री १२ वाजता शाहांना भेटायला जातात. नड्डा यांच्या स्वागताचे बॅनर्स मुख्यमंत्री मुंबईत लावतात. ही वेळ तुमच्यावर आली आहे. भाजपा नेत्याच्या स्वागताचे बोर्ड आपण लावताय. तुम्ही स्वत:ला शिवसेना म्हणवता मग हे कुठून आले? हा चायना मेड माल आहे, चायनाची शिवसेना आहे अशी टीका संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केली.
दरम्यान, एकनाथ शिंदेंना ईडी, सीबीआयने फोडलं आहे. देवेंद्र फडणवीस डमरु वाजवतायेत आणि २ माकडे नाचताय. ५०-५० खोके आले कुठून? महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा अत्यंत बिकट आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कोरोना काळात महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा उत्तमप्रकारे सांभाळली, जगाने त्याची दखल घेतली. तुम्ही आम्हाला काय सांगताय असंही संजय राऊत यांनी म्हटलं.