मुंबई : विरोधीपक्ष नेते अजित पवार हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवून भाजपात प्रवेश करतील अशा चर्चेचं वादळ दोन-तीन दिवसांपुर्वीच उठलं होतं. यावर सविस्तर पत्रकार परिषद घेत मी कुठेही जाणार नाही राष्ट्रवादीतच राहणार असं अजित पवार यांनी सांगितलं होतं. मात्र आता यानंतरही संजय राऊत आणि अजितदादा यांच्यात वाक्युध्द रंगलेलं दिसत आहे. अशात भाजपा खासदार अनिल बोंडेंनी एक मोठा दावा केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अनिल बोंडे म्हणाले की, शिवसेनेतले ४० आमदार संजय राऊत यांच्यामुळेच फुटले. अजित पवारही संजय राऊत यांना कंटाळून महाविकास आघाडी सोडतील. शिवसेना फोडण्यासाठी जसे राऊत जबाबदार आहेत तसंच महाविकास आघाडी फोडण्यासाठीही संजय राऊतच जबाबदार ठरतील. संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच अजित पवार यांना संजय राऊत महाविकास आघाडीतून बाहेर काढतील. आधी चाळीस आमदारांना बाहेर काढलं आता अजित पवारांनाही बरोबर आयडियाने बाहेर काढलं जाईल.
संजय राऊत हे जसं सांगितलं आहे तसंच वागत आहेत. ते परवा म्हणालेही ना.. मी फक्त मोठ्या साहेबांचंच ऐकतो. आधी शरद पवारांच्या सल्ल्याने शिवसेना फोडली आता महाविकास आघाडी फोडतील. हे सगळं नियोजनबद्ध पद्धतीने चाललं आहे. महाराष्ट्रातल्या जनतेची करमणूक होते आहे असं अनिल बोंडेंनी म्हटलं आहे. भाजपा खासदार अनिल बोंडेंच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.