मुंबई : महाविकास आघाडीसोबत जायचे की नाही? यावरुन वंचित बहुजन आघाडीचे तळ्यात मळ्यात सुरु आहे. जागा वाटपावरुन दोन्ही बाजूंनी बैठका पार पडल्या तरी अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या एका विधानामुळे वंचित बहुजन आघाडीने एकला चलो रे…ची भुमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे सन्माननीय नेते आहेत. त्यांच्याशी अनेकदा चर्चा झाली. आम्ही त्यांना ४ जागांवर लढावे हा प्रस्ताव दिला. परंतु त्यांची वेगळी भूमिका आम्हाला दिसतेय. तो प्रस्ताव मान्य केला असता तर नक्की आम्हाला आनंद झाला असता. हुकुमशाही विरोधातील लढ्याला संविधान वाचवण्याच्या लढाईला बाळासाहेब आंबेडकर हे आमच्यासोबत असण्यानं गती आणि बळ मिळालं असते. पण आम्हाला अजूनही खात्री आहे. सगळे प्रमुख नेते एकत्रित बसतील आणि ते पुन्हा बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील. त्यांच्या मनात जर काही नाराजी, अस्वस्थता असेल तर ती दूर करण्यात आम्हाला यश येईल,असं त्यांनी सांगितले.
तर सांगलीच्या जागेवर आम्ही ठाम आहोत. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरची जागा महाविकास आघाडीत ऐक्य राहावे यासाठी दिली आहे. तिथे विद्यमान खासदार शिवसेनेचा आहे. हातकणंगलेच्या जागेवर आमची राजू शेट्टींशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील एखादी जागा आमच्याकडे असावी आणि ती आम्ही ताकदीने लढावी. ही आमची भूमिका असेल तर त्यात काही चुकीचे असेल वाटत नाही असं सांगत राऊतांनी पुन्हा सांगलीच्या जागेवर दावा सांगितला.