संजय राऊत शरद पवारांना म्हणाले नटसम्राट; भुजबळांनही काढला चिमटा

मुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावरुन छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. यावेळी त्यांनी शरद पवार यांना नटसम्राटाची उपमा दिली. राऊत हे त्यांच्या विधानांमुळे दररोजच चर्चेत राहतात. आता त्यांनी पुन्हा एकदा मोठं विधान केल्याने त्यावर चर्चा सुरु झाली आहे.

 पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, छगन भुजबळ हे खूप मोठे कलाकार आहेत, त्यांनी चित्रपटातही काम केलेले आहे. खूप वेळा आपले रंगरूप बदलून एक नाट्य निर्माण करण्यात छगन भुजबळ माहीर आहेत. छगन भुजबळ का गेले, कशासाठी गेले, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कसा हंगामा झाला हे सर्वांना माहिती असल्याचा चिमटाही त्यांनी यावेळी काढला.

दरम्यान शरद पवार यांच्या बद्दल बोलतांना ते म्हणाले की, भुजबळ मोठे कलाकार असले तरी शरद पवार हे सर्वांत मोठे नटसम्राट आहेत, त्यांना देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रतिष्ठा आहे. महाराष्ट्रात एक खुले रंगमंच आहे ते फिरत राहतात, छगन भुजबळ यांसारखे जे नेते आहेत ते फिरत्या रंगमंचाचे कलाकार आहेत, या शब्दांत संजय राऊतांनी टोलेबाजी केली.

यावेळी राऊत यांनी शिंदे सरकारच्या धोरणांवरही जोरदार टीका केली. आता लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे रुपये आणि लाडक्या भावांना ६ हजार, पदवीधरांना १० हजार, खरी गरज लाडक्या बहिणींना आहे अशी आमची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरातील लाडकी बहीण किंवा सून त्यांचे घर पंधराशे रुपयात चालू शकते का? अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे