मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र आता त्यांनी चक्क भाजपाचे आभार मानले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीत भाजपाकडून नारायण राणे तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने विनायक राऊत यांना उमेदवारी दिली आहे. यावरुन आमच्यासमोर नारायण राणे हेच उमेदवार हवे होते, असे सांगत संजय राऊत यांनी भाजपाचे आभार मानले आणि खोचक टोला लगावला आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गातून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यासंदर्भात खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. संजय राऊत म्हणाले की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात विनायक राऊत विरुद्ध नारायण यांच्यात सामना होणारच नाही. तिथे एकतर्फी लढत आहे. कोकणात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये फक्त शिवसेनेच्याच उमेदवाराला लोक मतदान करतात. नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत, आम्हाला त्या मतदारसंघात आमच्यासमोर तेच हवे होते. भाजपाने आमची विनंती मान्य केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, आज नारायण राणे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेदेखील उपस्थित होते. ते म्हणाले की, खूप वर्षांनी भाजपाला ही जागा मिळाली आहे. मला खात्री आहे की, इथे कमळ फुलेल. विनायक राऊतांचा पराभव होईल. नारायण राणे अडीच लाखापेक्षा जास्त मताधिक्याने जिंकतील, असा प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.