मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर रोजच एकमेकांवर टीका, आरोप केले जात आहेत तसेच काही समर्थक पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. नुकतेच उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भूषण देसाई यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतला. आता ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असल्याच सांगितलं जातंय. दरम्यान, संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी हा काही धक्का वगैरे नसल्याचं स्पष्ट केलं आहे. भूषण देसाई शिंदे गटात का गेले याचं कारणही राऊत यांनी सांगितलं आहे. तसेच मिंधे गट पूर्वी बाप पळवत होता. आता मुलंही पळवायला लागला, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. शीतल म्हात्रे यांच्या व्हिडीओ प्रकरणीही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रकरणात पुरुष आमदाराचं काही म्हणणं असेल ना? ते कुठे आहेत? असा सवाल राऊत यांनी केला.
काय म्हणाले संजय राऊत?
मिंधे गट कधी बाप पळवतात. आता मुलंही पळवायला लागले आहेत. बाप आणि मुलं पळवण्याची ही मेगा भरती सुरू आहे. पण ती कूचकामी ठरेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ते दिल्ली पत्रकारांशी बोलत होते. भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश का केला? याचं कारणही त्यांनी सांगितलं. सामंत लोणीवाले हे राज्यातील मंत्री आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी भूषण देसाईंवर आरोप केले होते. त्यांच्या चौकशीचे आदेशही दिले होते. त्याचं काय झालं? त्याचं उत्तर देणार की नाही? तुम्ही आधी यावर उत्तर द्या, मगच आम्ही उत्तर देऊ, असं राऊत म्हणाले.