Sanjay Raut on Raj Thackeray And Uddhav Thackeray : आमच्यातील वाद, भांडणं, मतभेद अगदीच किरकोळ आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे, वाद बाजूला ठेवून एकत्र येण्याची माझी तयारी आहे, अशी भूमिका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर शनिवारी विशद केली. मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरे बोलत होते.
राज ठाकरे यांच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली. किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी तयार आहे, मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन करतो. यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. आता याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं वक्तव्य केलंय. “जर दोन प्रमुख नेते जे भाऊ आहेत, ते ठाकरे आहेत. ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याच्या विषयावर जर त्यांची सहमती होते, तर त्यात फार वादविवाद करणं योग्य नाही”, असं वक्तव्य त्यांनी केलं.
संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी दिलेला प्रतिसाद महाराष्ट्र हितासाठी आहे. आता यात अटीशर्ती वगैरे नाही. दोन प्रमुख नेते जे भाऊ आहेत ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायच्या विषयावर त्यांची सहमती होत असेल तर त्यात फार वादविवाद करणे योग्य नाही. या मताचा माझासारखा माणूस सुद्धा आहे. यात अटी आणि शर्ती कोणत्याच नाही.
पुढे संजय राऊत म्हणाले, माझ्यासारख्या माणसाने बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केले आहे. राज ठाकरे यांच्यासोबत काम केले आहे. मी राज आणि उद्धव यांच्यासोबत देखील एकत्र काम केले आहे.आता मी आदित्य ठाकरेंसोबत एकत्र काम करतोय. महाराष्ट्र हित हाच आमचा स्वाभिमान आहे. जे एक ध्येय गाठण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली ते ध्येय काय होते? महाराष्ट्र, मराठी माणूस आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं, ही त्यांची भूमिका होती. आता मतभेदाचे जोडे बाहेर काढून या संदर्भात काम करणारे लोक एकत्र येणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागत केलेले आहे. कुठलीही अट आणि शर्त टाकलेली नाही. महाराष्ट्र हिताला प्राधान्य द्या आणि जे महाराष्ट्र हिताचे शत्रू आहेत, त्यांच्या पंगतीलाही बसू नका, यात कुठली अत आणि शर्त नाही, अजिबात नाही, असे त्यांनी म्हटले.