संजय राऊत आज राज ठाकरेंना म्हणाले भाजपाचा पोपट, कारण…

मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १४ श्री सेवकांचा मृत्यू झाला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. त्याबाबत राज ठाकरेंना विचारलं असता कोरोना काळातही राज्यात हलगर्जीपणा झाला होता. त्या काळातल्या हलगर्जीपणाबद्दल आजही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर याविषयी संजय राऊत यांना राज ठाकरेंबाबत विचारलं असता संजय राऊत यांनी राज ठाकरेंचा उल्लेख भाजपाचा पोपट असा केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने काही पोपट पाळून ठेवले आहेत. त्यांना बोलू द्या. नोटबंदीच्या वेळेस हजारोंच्यावर लोक रांगेत उभं राहून मृत्यूमुखी पडल होते. तो सदोष मनुष्यवधच होता. त्यावरही भाजपाच्या पोपटांना बोलावं. कोरोनाच्या वेळेस गंगेत हजारो प्रेतं वाहत आली होती. गुजरातमध्ये तर प्रेतं जाळायला जागाही नव्हती. मग गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राज ठाकरे यांनी करावी, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे दररोज महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. आता त्यात पुन्हा एका विधानाची भर पडली आहे. आधीच राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी वाद वाढवून घेतला आहे. आता त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. यास राज ठाकरे काय प्रतिउत्तर देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.