मुंबई : आगामी लोकसभा व राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र महाराष्ट्रात विरोधकांपुढे मोठे आव्हानं आहेत कारण मविआतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमधले विद्यमान आमदार मोठ्या प्रमाणावर सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे आता मविआचं जागावाटप कसं असेल? हाच मोठा प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी मविआच्या जागावाटपावरुन मोठं विधान केलं आहे.
गेल्या वर्षी शिवसेनेतील ४० विद्यमान आमदार शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करत भाजपाबरोबर गेले. गेल्या महिन्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचेही जवळपास तेवढेच आमदार सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे मविआमध्ये २०१९ साली पक्षानं जिंकलेल्या जागा त्या त्या पक्षाकडे राहणार, की विद्यमान आमदार त्या पक्षाकडे असणाऱ्या जागा त्या पक्षाला मिळणार? यावर खल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात मविआ मजबूत आहे. मविआ विधानसभा, लोकसभा एकत्र लढणार आहे. अनेकांना जागावाटपात तडजोडी कराव्या लागतील. ते करायला आमची तयारी आहे. आमच्या कार्यकर्त्यांची मानसिकता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या प्रमुख नेत्यांनी हे ठरवलं आहे की जागावाटपावरील मतभेद उघड करायचे नाहीत. जिंकेल त्याची जागा, जागेचा हट्ट धरायचा नाही हे सूत्र आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.