मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांशी चर्चा केल्यानंतरच झाला होता असा गौप्यस्फोट केल्यानंतर पहाटेच्या शपथविधीबाबत संजय राऊतांनाही माहिती होती, असा दावा आमदार संजय शिरसाठ यांनी केला आहे. आमदार संजय शिरसाट म्हणाले की, संजय राऊत हा साधासुधा माणूस नाही. हे सत्तांतर झाले ते सहजासहजी झाले नाही. संजय राऊत हा सायको आहेत. हा कधी काय बोलेल आणि कधी कुणाला अडचणीत आणेल हे सांगता येत नाही. उद्धव ठाकरेंना या सायकोपणामुळेच अडचणीत आणले, असेही ते म्हणाले. पहाटेच्या शपथविधीवर जर अजित पवारांनी भाष्य केले तर महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच स्फोट होतील असा इशाराही आमदार संजय शिरसाट यांनी केला.
जेव्हा २०१९ मध्ये सत्तांतर होणार होते. मातोश्रीवरील बैठक, एकनाथ शिंदे यांना दिलेल्या सूचना हे सर्वकाही सुरू असताना संजय राऊत पडद्यामागून वेगळ्या हालचाली करत होते. शरद पवार आणि संजय राऊतांचे घट्ट नाते आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आम्ही सगळे हॉटेलमध्ये असताना टीव्हीवर पाहिले शपथविधी सोहळा झाला. त्यानंतर ज्या घडामोडी घडल्यात त्यात एक ट्विस्ट आला. आता जर हे थांबवायचं असेल तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न करता उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करावं लागेल हे ट्विस्ट झाले. गेमचेंजर त्याठिकाणी झाला. उद्धव ठाकरेंची इच्छा नव्हती तरी त्यांना मुख्यमंत्री व्हावे लागले असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत सत्ता मिळवल्यानंतर उद्धव ठाकरेंना सत्ता राबवता येत नाही हे शरद पवारांना माहिती होते. संजय राऊत हा त्यातला प्यादा होता. संजय राऊतांना पहाटेचा शपथविधी माहिती होता. हे उद्धव ठाकरेंना कळाले होते. परंतु परिस्थितीने त्यांना काहीच करता येत नव्हते. पुन्हा भाजपाकडे जायचं नाही म्हणून त्यांनी हे पद स्वीकारले. काँग्रेस सक्रीय नव्हती. परंतु राष्ट्रवादी शिवसेनेला संपवेल हे आम्ही सांगितले होते. आज तेच झाले राष्ट्रवादीने स्वत:चं अस्तित्व मोठे केले आणि शिवसेनेचे नुकसान झाले असंही आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले.