सोलापूर : काही दिवसांपूर्वी बार्शीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. त्या पीडित मुलीचा रक्तबंबाळ झालेला फोटो खासदार संजय राऊत यांनी ट्विट केल्याने त्यांच्यावर बार्शी शहर पोलिसात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी रात्री उशीरा संजय राऊत यांच्याविरोधात बार्शी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली. संजय राऊत यांच्या या ट्विटनंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. आता हे प्रकरण संजय राऊत यांनाच अंगलट येण्याची शक्यता आहे.
बारावीचा पेपर देऊन घरी येणार्या मुलीला रस्त्यात अडवून दोन नराधमांनी तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला होता. पीडिता पोलिसात गेल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी न करता पोलिसांनी तिला घरी पाठवले होते. दुसर्या दिवशी पुन्हा ती पोलिसांत गेली होती. त्या दिवशी तिच्या घरी जाऊन त्या दोघांनी जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली.
या प्रकरणात पोलिस महानिरीक्षक एस. बी. फुलारी यांच्या आदेशाने एका सहायक पोलिस निरीक्षकासह एक महिला पोलिस उपनिरीक्षक आणि दोन हवालदार यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिस निरीक्षकांचा हलगर्जीपणा आहे का, याची पडताळणी उपअधीक्षक विशाल हिरे हे करीत आहेत.