शरद पवारांच्या भूमिकेबद्दल संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी अजित पवारांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार म्हणाले, “अजित पवार आमच्या पक्षाचे नेते आहेतच. त्यात कोणताही वाद नाही. राष्ट्रीय पातळीवर एक मोठा गट वेगळा झाला तर त्याला पक्षात फूट म्हणता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तशी परिस्थिती नाही. यावर महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून यावर मोठी प्रतिक्रिया आली आहे. खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी पत्रकारांनी राऊत यांना विचारलं की शरद पवारांच्या अजित पवारांबद्दलच्या वक्तव्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे का? त्यावर संजय राऊत म्हणाले, यावर आता शरद पवार यांनी उत्तर द्यायचं आहे. त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी उत्तर द्यायचं आहे. मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मी आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीमध्ये अजित पवार नाहीत, केवळ शरद पवार आहेत.

खासदार संजय राऊत म्हणाले, भाजपाबरोबर गेलेल्यांना, हुकूमशाही प्रवृत्तीबरोबर हातमिळवणी करणाऱ्यांना, अशा कोणत्याही नेत्याला किंवा पक्षाला महाविकास आघाडीत स्थान नाही. ईडीला घाबरून ज्यांना जायचं आहे ते जाऊ शकतात. मग ते आमच्याकडून गेलेले असतील अथवा राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेलेले असतील, तो निर्णय त्यांचा आहे. जसं शरद पवार म्हणाले, ही लोकशाही आहे, त्यामुळे तो निर्णय त्यांचा असेल. परंतु, आमचेही काही निर्णय आहेत. दोन दगडांवर किंवा तीन दगडांवर पाय असं कोणाचं राजकारण असेल तर त्यासंदर्भात जनता निर्णय घेईल.