हक्कभंगाच्या नोटिशीला संजय राऊतांचे उत्तर, म्हणाले…

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळ हे चोरमंडळ आहे, असं विधान केलं होतं. या विधानानंतर मोठा गदारोळ माजला होता. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी संजय राऊतांवर चांगलीच टीका केली होती. त्यानंतर राऊतांना हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र दिलेल्या वेळेत राऊतांनी नोटिशीला उत्तर दिलं नव्हतं. त्यामुळे आता हा विषय केंद्राकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तसंच त्यांना स्मरणपत्र पाठवण्यात येणार असल्याच्याही चर्चा होत्या. मात्र आता अखेर संजय राऊतांनी हक्कभंगाच्या नोटिशीला उत्तर दिलं आहे.

आपल्या उत्तरात संजय राऊत म्हणतात, मी मुंबईच्या बाहेर असताना या वक्तव्याचा विपर्यास करण्यास आला. हे वक्तव्य विधीमंडळातील सदस्यांचा अवमान करण्याकरता केलं नसून हे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतं होतं. विधिमंडळाच्या भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि नसणार आहे. मी केलेलं वक्तव्य तपासून पाहावं.