संजय राऊतांचा एकनाथ शिंदेवर हल्लाबोल

मुंबई : राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेले होते. ज्या उमेदवाराच्या प्रचाराला ते गेले होते त्याच्या पोस्टरवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘हिंदूहृदय सम्राट’ असा करण्यात आला होता.

या पोस्टरचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर आता त्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण पेटलं आहे. उद्धव ठाकरे गट यावरुन आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे.

प्रकरण काय?

राजस्थानात विधानसभा निवडणुकीचा प्रचार काल संपला. या शेवटच्या दिवशी हवामहल मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बालमुकुंदाचार्य यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.

या रॅलीला मोठी गर्दी देखील जमवण्यात आली होती. या रॅलीची माहिती देणाऱ्या आणि स्वागतासाठीच्या एका पोस्टरवर भाजपच्या नेत्यांसह एकनाथ शिंदे यांचाही मोठा फोटो लावण्यात आला होता. पण शिंदेंच्या नावावर त्यांचा उल्लेख हिंदू हृदयसम्राट असा करण्यात आला होता.

संजय राऊतांचा हल्लाबोल

दरम्यान, या प्रकारावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं असून त्यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, आम्ही इतके वर्षे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं काम केलं. त्यांचा संघर्ष पाहिला हिंदुत्वासाठी त्यांनी सत्तेसाठी कधी बेईमानी केली नाही.

आता सत्तेसाठी बेईमानी करणाऱ्यांना हिंदुहृदय सम्राट म्हणण्याची नवी परंपरा नव्या हिंदुत्वात सुरु झाली असेल तर पहावं लागेल. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अन् स्वातंत्र्यवीर सावरकर हे दोनच असंही राऊत यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे हे हिंदूहृदय सम्राट असतील तर त्यांनी हिंदुहृदय सम्राट म्हणून काय असं महान कार्य केलं आहे. हे आम्हाला सगळ्यांना पाहावं लागेल, अशा शेलक्या शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.