मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर रोजच एकमेकांवर टीका केली जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख मख्खमंत्री असा केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
महाराष्ट्राला मुख्यमंत्री नसून मख्खमंत्री लाभले असल्याचे राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले. महाराष्ट्रात सरकारच अस्तित्वात नाही. म्हणून हा सर्व गदारोळ सुरू आहे. लाल वादळ मुंबईच्या वेशीवर तळ ठोकून आहे. तुम्ही या लाल वादळाला किती काळ रोखणार? इथे अराजकाची ठिणगी पडली तर महाराष्ट्रात वणवा पेटेल हे त्यांना माहिती आहे का? ते दिल्लीच्या इशाऱ्यावर राज्य चालवत आहेत. हे लोक महाराष्ट्र संपवायला निघाले आहेत. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यांच्याविरोधात रान उठवण्याची भूमिका मविआने घेतली आहे. आता मविआच्या एकत्र सभा आणि उद्धव ठाकरेंच्याही स्वतंत्र सभा होतील, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यावेळी संजय राऊतांनी लक्ष्य केले. या राज्याला मुख्यमंत्री नाहीत. या राज्याला मख्खमंत्री मिळाले आहेत. मुख्यमंत्री असते तर राज्याची अशी अवस्था झालेली दिसली नसती. सगळी सूत्र उपमुख्यमंत्र्यांकडे आहेत. मुख्यमंत्री फक्त ४० खोकेबाज आमदारांना एकत्र ठेवण्याचे काम करत आहेत. बाकी काही करत नाहीत, असे राऊत म्हणाले. दरम्यान, आज पुन्हा एकदा संजय राऊतांनी भाजप आमदार राहुल कुल यांना लक्ष्य केले. विरोधकांना ईडी, सीबीआय, ईओडब्ल्यूच्या माध्यमातून ब्लॅकमेल केले जात आहे. राहुल कुलचे मी ५०० कोटींचे प्रकरण दिले आहे. त्याच्यावर मुख्यमंत्री बोलतात का? भाजप आमदार राहुल कुल हे उपमुख्यमंत्र्यांचे अत्यंत जवळचे आहेत.
भीमा पाटणकर साखर कारखान्यातील ५०० कोटींच्या गैरव्यवहाराचे प्रकरण मी दिले आहे. राहुल कुलला मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री वाचवत आहेत. तुम्ही तुमच्या आसपास काय चाललंय ते पाहा आणि नंतर महाविकास आघाडीच्या कारभाराकडे बोट दाखवा, असा खोचक सल्ला संजय राऊतांनी दिला.