बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकारण चिघळले असून, पोलिसांवर आणि राजकारण्यांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडी आणि एसआयटीकडे आहे. मात्र, याच प्रकरणात बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते, ज्यामुळे वातावरण तापले आहे.
वादग्रस्त व्हॉट्सअॅप पोस्ट
खासदार बजरंग सोनवणे यांच्या आरोपांवर सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट करत म्हटले, “मी पत्रकार परिषद घेतली तर या खासदाराची चड्डी जागेवर राहणार नाही.” या पोस्टमध्ये खासदाराचे नाव स्पष्ट नसलं, तरी अप्रत्यक्षपणे बजरंग सोनवणे यांच्याकडे इशारा असल्याचे बोलले जात आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुपमधून वगळले
मुंडे यांच्या या पोस्टमुळे पोलीस आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. पोस्ट केल्यानंतर त्यांना बीडच्या पत्रकारांसाठी तयार केलेल्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपमधून वगळण्यात आले आहे. यामुळे मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
खासदारांच्या आरोपांमुळे विवाद
बजरंग सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिफळे यांच्याविरोधात मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी दोघांच्या कॉल रेकॉर्डची चौकशी करण्याची मागणी केली होती. या कॉल रेकॉर्डच्या तपासणीतून मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तपास वेगाने सुरू
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडी आणि एसआयटी करत असून, विविध धक्कादायक तथ्य समोर येत आहेत. मात्र, या प्रकरणात राजकीय आरोपांमुळे तपासाची दिशा वळवण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.