बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ९ डिसेंबर २०२४ रोजी घडली, आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ती खळबळ उडवणारी ठरली. या प्रकरणी दोन व्हिडीओंचा व्हायरल होण्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
या व्हिडीओमध्ये आरोपी सुदर्शन घुले आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांची भेट केजमधील हॉटेलमध्ये दाखवली जात आहे, आणि दुसऱ्या व्हिडीओमध्ये संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांचा देखील समावेश आहे. आता धनंजय देशमुख यांनी व्हिडीओची सत्यता स्पष्ट केली आहे.
काय म्हणाले धनंजय देशमुख ?
मी आगोदरच हॉटेलमध्ये बसलो होतो. त्यांनी मला वेटरद्वारे इशारा केला आणि मला त्यांच्या टेबलवर बोलावून घेतले. सहा तारखेला जे भांडण झालं होतं, त्याबाबत ते विचार होते.
पीएसआय राजेश पाटील यांच्याकडे या मारहाणीसंदर्भातील तपास होता. आमच्या गावचं मिटलं आहे असं मी त्यांना यावेळी सांगितलं. माझ्या भावाचा खून होणार असल्याची भनक मला लागली असती तर मी त्यांना भेटलोच नसतो.
आम्ही त्या हॉटेलमध्ये चहा घेतला. चहाचं बिल देखील मी दिले. त्यावेळी हाच आपला घात करणार आहे हे मला माहीत देखील नव्हते. या प्रकरणात राजेश पाटील आणि सुदर्शन घुले यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीदेखील यावेळी धनंजय देशमुख यांनी केली आहे.