पुणे : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. यासोबत आणखी एक आरोपी सिद्धार्थ सोनवणे याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, अजूनही एक आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे.
विशेष म्हणजे, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यातच लपून बसले होते. भिवंडी येथे काही दिवस वास्तव्य केल्यानंतर दोघे पुण्यात परतले होते.
डॉक्टर संभाजी वायभसेच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीतून या आरोपींच्या हालचालींचा तपशील उघड झाला. त्यानंतर बीड पोलिसांनी रात्री कारवाई करत या दोघांना अटक केली.
सिद्धार्थ सोनवणे याला कल्याणमधून अटक करण्यात आली आहे. सिद्धार्थ हा मसाजोगचा रहिवासी असून त्याने सरपंच संतोष देशमुख यांचं लोकेशन आरोपींना कळवलं होतं.
या तिघांना कोर्टाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींच्या चौकशीतून पुढील तपशील समोर येण्याची शक्यता आहे.