भुजबळांच्या विरोधानंतरही राष्ट्रवादीच्या कार्यालयात सरस्वती पूजन

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वतीच्या फोटोवरुन केलेल्या वक्तव्यावरुन राज्यभरात वाद निर्माण झाला होता. “शाळेत महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत. त्याऐवजी शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. शाळेमध्ये सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, शाहू महाराजांचा, बाबासाहेबांचा फोटो लावा. कर्मवीर भाऊराव पाटलांचा फोटो लावा. मात्र, सरस्वतीचा फोटो. शारदा मातेचा फोटो कशाला, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले होते. छगन भुजबळांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असताना, या प्रकरणी नाशिक भाजपने भुजबळांविरोधात आंदोलन केले होते. यावेळी सरस्वतीचे पूजन करत आंदोलकांनी छगन भुजबळांवर ताशेरेही ओढले होते.

दरम्यान, आज ४ ऑक्टो. रोजी भुजबळांच्या अशा वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयात सरस्वती पूजन आयोजित करण्यात आले आहे. एकीकडे भुजबळ सरस्वती पूजनाला विरोध करत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यालयात सरस्वती पूजन केले जात आहे. सरस्वती पूजनाचे आयेजन यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला देवी सरस्वतीबाबत उपरती झाली का ? अशी चर्चा सूरु आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनीही राष्ट्रवादीचे हे आमंत्रण ट्विट करून टोला लगावला आहे.राष्ट्रवादीच्या कार्यालयात आज सरस्वती पूजन, नेमका खरा चेहरा कुणाचा ? भुजबळ सरस्वतीच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करणार आणि राष्ट्रवादी थेट कार्यालयात सरस्वती पूजन करणार?, असा प्रश्न उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.