छत्रपती संभाजीनगर | शासकीय योजनेतील विहिरीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी १२ टक्के लाचेची मागणी केल्याच्या कारणावरून तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंचाने शुक्रवारी दुपारी फुलंब्री येथील पंचायत समिती कार्यालयासमोर चक्क दोन लाख रुपयांची उधळण केली. या सरपंचाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर, या आंदोलनाची दखल घेत, येथील बीडीओवर कारवाई करण्यात आलीय.
राज्याचे कॅबिनेटमंत्री गिरीश महाजन यांनी सरपंचांनी केलेल्या आंदोलनाची तात्काळ दखल घेत पंचायत समितीच्या बीडीओंना तात्काळ निलंबित केले आहे. तसेच, याप्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. गिरीश महाजन यांनी केलेल्या कारवाईचं सरपंच मंगेश साबळे यांनी स्वागत केलंय. तसेच, मी उधळलेले पैसेही त्या महिला अधिकार्यांकडून वसुल करुन, मला परत करावेत, अशी मागणीही आपण संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याचं साबळे यांनी म्हटलंय.
सरपंच मंगेश साबळे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या गावात विहिरीचे २० प्रस्ताव दाखल आहेत. या कामाला मंजुरी देण्यासाठी गटविकास अधिकारी १२ टक्के रक्कम मागत आहेत. म्हणून शुक्रवारी २ लाख रुपये घेऊन आलो; पण त्यांनी पैसे घेतले नाहीत. त्यामुळे या नोटा उधळल्या. गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी सरपंच साबळे यांच्याविरोधात फुलंब्री पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून साबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.