सरसंघचालकांची धर्मरक्षण सूत्रे !

अन्वयार्थ

– तरुण विजय

शौर्य आणि भारत भक्ती ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मूळ ओळख आहे. हिंदूंवर जेथे संकट येते तेव्हा तिथे लोक आशा आणि विश्वासाने संघाकडे पाहतात. राष्ट्ररक्षणाचा आपला संकल्प पूर्ण करण्याची आपली क्षमता आहे, हे गेल्या अनेक वर्षांत संघाने आपल्या संकल्पशक्तीने आणि संघटनेच्या बळावर सिद्ध केले आहे. ज्या रामजन्मभूमीवर मंदिराच्या उभारणीची कथित सेक्युलर नेते आणि पत्रकार टिंगलटवाळी करायचे, शौचालये किंवा रुग्णालये बांधण्याचे सल्ले देऊन हिंदूंच्या श्रद्धेची खिल्ली उडवायचे, तिथे आता जगातील सर्वात भव्य श्रीराम मंदिराच्या उभारणीचे कार्य सुरू आहे, ज्याचे लोकार्पण लवकरच होणार आहे. डॉ. हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या संघशक्तीचा हा चमत्कार आहे. रा. स्व. संघ २०२५ मध्ये स्थापनेची शताब्दी साजरी करणार आहे. अवघ्या १०० वर्षांच्या कार्यकाळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संपूर्ण भारतामध्ये असे काही चैतन्य निर्माण केले आहे की, ज्यामुळे भारताचे प्रमुख शक्ती केंद्र संघच आहे असे संपूर्ण जग मानू लागले आहे, जो आज राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक अजेंडा ठरवण्यास तसेच धोरणे प्रभावित करण्यास सक्षम आहे व जगातील प्रमुख विचारवंतांसोबत बौद्धिक चर्चा करण्यासही पूर्णपणे सक्षम आहे.

परंतु धर्मावर येणारी संकटे आणि हिंदू धर्मांतर्गत अनिष्ट रूढी-परंपरा, गोंधळ तसेच विविध मतपंथ यांच्याशी समन्वय कोणत्या निकषांवर प्रस्थापित केला जाऊ शकतो, कोणत्या बिंदूंचे पालन करून अस्पृश्यतेसारख्या विकृतीपासून मुक्तता मिळवता येईल? या सगळ्यांबाबत संघाची काही धोरणात्मक भूमिका आहे काय? संघाचा मूलभूत विचार, चिंतनच अस्पृश्यता संपुष्टात आणण्यास प्रेरित करते. अस्पृश्यता हा हिंदू धर्माचा भाग नाही, ती अस्वीकार्य आणि धर्मविरोधी आहे, असा प्रस्ताव, १९६६ मध्ये उडुपी (कर्नाटक) येथे भरलेल्या भारतीय धर्म संसदेत सर्व संतांकडून पारित करवून घेण्यात संघाच्या वर्तमान विराट स्वरूपाचे शिल्पकार माधव सदाशिवराव गोळवलकर यशस्वी ठरले होते. एखादी प्रथा किंवा सामाजिक व्यवहार फार जुन्या काळापासून चालत आलेले असल्याने ते कालातीत आहे असे म्हणता येणार नाही, असे १९७४ मध्ये तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनीदेखील म्हटले होते. जर अस्पृश्यता हे पाप नसेल तर काहीही पाप नाही. जातिव्यवस्था कालबाह्य झाली आहे, ती हळूहळू संपुष्टात येत आहे, ती कायमची संपुष्टात यायलाच हवी, असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले होते.

धर्म रक्षणासाठी पौरुष प्रकट करणे, पराक्रम गाजविणे, आक्रमकांना रोखठोक प्रत्युत्तर देणे आणि जुन्या, कालबाह्य रूढी संपुष्टात आणून ख-या धर्मसंमत निकषांवर आपला काळानुरूप व्यवहार निर्धारित करणे हाच हिदू धर्माच्या रक्षणाचा मार्ग आहे. वर्तमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनीही हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आपला व्यवहार, वर्तन निर्धारित करण्यासाठी तीन सूत्रेदेखील दिली आणि विवेकानंदांच्या वीर भावनेने निर्भीडपणे जाहीर केले की, हिंदूंसाठी पाणी, मंदिरे आणि स्मशानभूमी समान आहेत, या तीनही गोष्टी सर्वांसाठी खुल्या असल्या पाहिजेत. यात कुठल्याही प्रकारचा जातिगत भेदभाव अमान्य आणि धर्मविरुद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. डॉ. मोहनजी भागवत यांनी ही नि:संदिग्ध घोषणा करून शतकांची रूढी संपवून नवीन पर्व सुरू केले. जे सदैव बाबासाहेबांचे स्वप्न होते, तो सुधारणावादी व क्रांतिकारक विचार परमपूजनीय बाळासाहेबांनी वसंत व्याख्यानमालेच्या मार्फत आणखी पुढे नेला; त्याला डॉ. मोहनजी भागवत यांनी अधिकच तर्कसंगत व युगानुकूल केले आहे. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी आयुष्यात कधीही जातिभेद पाळला नाही. गांधीजी वर्धेत संघाच्या शाखेत आले तेव्हा त्यांनी विचारले- यामध्ये किती हरिजन आणि किती उच्चवर्णीय आहेत? डॉक्टरांनी मंद स्मित करीत उत्तर दिले होते की, सर्व केवळ हिंदू आहेत- आम्ही जातिभेद मानत नाही. हे ऐकून गांधीजींनाही आश्चर्य वाटले
हे वाचलं का तुम्ही … भारतात यंदा दुष्काळ पडणार?

जिथे गांधी अपयशी ठरले होते ते काम आज संघ यशस्वीपणे करीत आहे. समरसतेच्या क्षेत्रात, संघाचे मूक तपस्वी देशाच्या सर्व भागात जातिभेदांना मुळीच थारा न देता सामाजिक क्रांती घडवत आहेत. पण या विषयावर संत आणि हिंदू संघटनाच राष्ट्रीय स्तरावर काम करीत आहेत का? बहुतांश राजकीय नेते इकडे तिकडे धावपळ करून राजकारण करण्यात व्यस्त आहेत. तर संघ क्रांतिकारी आवाहनाला अनुसरून कार्य करीत आहे तर दुसरीकडे रामकृष्ण मठ, गायत्री परिवार, स्वामीनारायण संप्रदाय यादेखील आध्यात्मिक, सामाजिक तसेच सेवा क्षेत्रात कार्यरत आहेत. या संघटना कोणाच्याही आश्रयावर किंवा देणगीवर अवलंबून नाहीत. हा स्तंभ मी उत्तराखंडमधून पाठवत आहे.इथे हुशार, सुजाण असणारे बहुतेक लोक कषाय वस्त्र धारण करूनही आर्थिक आणि अन्य सुविधांच्या मागे धावत सुटताना दिसतात. उत्तर पूर्वांचलमध्ये ख्रिश्चन धर्मांतर झपाट्याने सुरू आहे याची त्यांना जराही पर्वा नाही, दलित क्षेत्रात सवर्ण अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत, याची त्यांना पर्वा नाही.

सरकारने स्थापित केलेल्या यंत्रणांकडेही ते लक्ष देत नाहीत, अनुसूचित जातींवरील अत्याचाराच्या घटनांच्या वार्ता रोज येत आहेत. पंजाबमध्ये होत असलेल्या धर्मांतराचीही त्यांना पर्वा नाही, पण ते स्वत:ला हिंदू धर्माचे प्रचारक आणि व्याख्याते म्हणवून घेतात.याच भोंदू, पाखंडी लोकांनी धर्मावर मोठा आघात केला होता. आज देशातील बहुतांश हिंदू मंदिरे सरकारच्या ताब्यात आहेत. त्यात कम्युनिस्ट आणि काँग्रेसी सरकारे गैरहिंदू व्यक्तींना मोठ्या पदांवर नियुक्त करतात. हिंदू समाजातील समरसतेशी त्यांना काय देणे-घेणे? आता हिंदू समाजाने सर्वात मोठा सामाजिक प्रश्न सोडविण्याचा निर्धार करून डॉ. मोहनजी भागवत यांचे सामाजिक समरसतेची आणि हिंदू ऐक्याची धर्मसूत्रे अंमलात आणणे आवश्यक आहे. हा संधिकाळ आहे, यामध्ये सेनापतीच्या दृष्टीनुसार कार्य करावेच लागणार आहे.आज हिंदू समाजाचे नेतृत्व कोणत्याही राजकीय नेत्याकडे नव्हे तर रा. स्व. संघाच्या प्रमुखांकडे आहे.