भुसावळ (गणेश वाघ) : कुणी हिणवंल तर कुणी अडवणं मात्र ती डगमगली नाही, घाबरली नाही… प्रत्येक संकटाला तिने धैर्याने तोंड देत लढाई जिंकली. स्त्री-पुरूषांना समान अधिकार मिळाले असलेतरी तृतीयपंथीयांना मात्र अधिकारासाठी आजही लढावे लागते हेदेखील तितकेच खरे ! त्यातलीच ती. चाँद सरवर तडवी उर्फ बेबो (27). कधी रेल्वेत पैसे मागितले तर कधी धुळ्यात यल्लमा मातेचा तिने जोगवा स्वीकारत कुटुंबाला हातभार लावला. संकटांना जिद्दीने परतावून लावणार्या चाँदला आता पोलिस दलात सेवा करायची आहे, दृष्ट प्रवृत्तींवर प्रहार करायचा आहे, समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी तिची धडपड सुरू आहे. धुळ्यातील पोलिस भरतीत राज्यातून ती एकमेव तृतीयपंथी उमेदवार म्हणून धावली व यशाला तिने गवसणीदेखील घातली. आता लेखी परीक्षेत यश मिळवणार असल्याचा विश्वास तिने व्यक्त केला असून त्यासाठी अभ्यासालादेखील तिने सुरूवात केली आहे.
आयुष्यभर दिली परीक्षा आता मात्र सत्व‘परीक्षा’
भुसावळातील चाँद उर्फ बेबोच्या आयुष्यात संकटांची मालिका तिच्या जन्मानंतरच सुरू झाली. वयाच्या दहाव्या वर्षी प्रेमात पडलेल्या चाँदला तृतीयपंथी असल्याचे सांगून बाजूला सारलं गेल्यानंतर तिच्या भोवतीची संकटांची मालिका थांबली नाही. घरात आई, वडिल व तीन बहिणी व भाऊ असा परीवार मात्र त्यात आई जयबून तडवी यांना कॅन्सरने ग्रासले मात्र प्रतिकुल परीस्थितीत खर्च पेलवत नसताना कुटुंबासाठी चाँदही रस्त्यावर उतरली. कधी रेल्वेत पैसे मागून तर कधी जोगवा मागून तिने आपल्या परीने मदत केली. 2021 मध्ये आईच्या निधनानंतर बेबो पोरकी झाल्यानंतर जवाबदारी अधिकच वाढी मात्र दुसरीकडे शिक्षणाची जिद्द तिला स्वस्थ बसू देत नव्हती मात्र समाजाची मानसिकता शाळेतही तिला शिक्षण घेवू देत नव्हती. अनेकवेळा तिने शाळा बदलल्या व दहावीपर्यंत मजल गाठली व नंतर तिने ब्युटीपार्लरचा कोर्स करून फर्दापूरच्या महाविद्यालयात वाणिज्य विषयात पदवीचे शिक्षण ती घेत आहे.
…मात्र ती डगमगली नाही
तृतीयपंथी म्हणून वारंवार पदोपदी अपमान तिच्या नशिबी आला मात्र ती थकली नाही, हरली नाही वा डगमगली नाही. प्रत्येक संकटाला तिने धैर्याने तोंड दिले. वेश्याव्यवसायातही तिला ओढण्याचा प्रयत्न झाला मात्र मैत्रीण आम्रपालीने तिची सुटका केली. समाजात वाईट प्रवृत्ती असतात तशा चांगल्याही असतात. नीलू गुरू, तृतीयपंथीयांचे नेतृत्व करणार्या शमीभा पाटील, समाधान तायडे आदींनी योग्यवेळी केलेल्या मार्गदर्शनाने चांदच्या जीवनाला नवी दिशा मिळाली.
समाजसेवेसाठी व्हायचे आहे पोलिस
सर्वोच्च न्यायालयाने सरकारी नोकर्यांमध्ये तृतीयपंथीयांना देखील समाविष्ट करण्याचा आदेश अलिकडेच दिल्यानंतर धुळ्यात पोलिस भरतीत शिपाई पदासाठी चांदने अर्ज केला. धावण्याचा दिवस निश्चित झाला व धुळ्याचे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी चाँदचे मनोबल वाढवल्यानंतर तिने शुक्रवार, 17 मार्च रोजी तिने धुळ्यात मैदानही जिंकले. 50 पैकी 35 मार्क्स तिला मिळाले आहेत. आता जयश्री इंगळे यांच्या माध्यमातून समाधान तायडे यांच्या अकॅडमीत लेखी परीक्षेच्या अभ्यासासाठी तिने प्रवेश घेतला असून तायडे हे निशुल्क तिला मार्गदर्शन करीत आहेत.
समाजाची सेवा करायची आहे
चाँदशी संपर्क साधला असता ती म्हणाली की, आयुष्यात अनेक संकटांनी मी धैर्याने तोंड दिले असून त्यात यशस्वी झाली आहे. समाजाची सेवा करण्यासाठी पोलिस व्हायचे आहे, दृष्ट प्रवृत्तींना धडा शिकवणे हेच आपले ध्येय असल्याने त्यासाठी पोलिस व्हायचे आहे व 2 एप्रिल रोजी होणार्या लेखी परीक्षेतही मी निश्चित यशस्वी होईल, असा विश्वास तिने ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केला.