सावरकर विचार मनोमनी रुजावा!

तरुण भारत लाईव्ह : ‘माफी मागायला मी सावरकर नाही, मी गांधी आहे आणि गांधी कधी माफी मागत नाहीत’, असे विधान करून सावरकरांचा पुन्हा एकदा अपमान करणार्‍या राहुल गांधींचा देशात सर्व स्तरांवरून निषेध होत असून राज्यातील जनते सावरकर कळावे, त्यांच्या गुणांची ओळख व्हावी, त्यांच्यातील राष्ट्रभक्ती जनमानसात रुजावी तसेच त्यांना माफीवीर म्हणणार्‍या राहुल गांधींचा बावळटपणा, बालिशपणा, करंटेपणा आणि ‘लौकिक’ जनतेपुढे यावा, या हेतूने राज्यात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने सावरकर गौरव यात्रा काढून, त्यांच्या प्रतिमाहरणाला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा घेतलेला निर्णय देशातील राष्ट्रवादी शक्तींचे बळ वाढवणाराच म्हणायला हवा. सावरकर व्हायला त्यागाची भावना आणि देशाप्रती प्रेम असावे लागते.

विदेशात जाऊन देशाचा अपमान करणार्‍यांमध्ये हे गुण असूच शकत नाहीत. सावरकरांसारखा त्याग करण्याची तुमची लायकीसुद्धा नाही, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांची खिल्ली उडविली असून सावरकरांची महती महाराष्ट्राच्या नसानसांत भिनवण्यासाठी गौरव यात्रेच्या निमित्ताने प्रयत्न केले जाणार असल्याचे घोषित केले. एका अर्थाने सावरकर गौरव यात्रेसाठी राहुल गांधी हेच कारणीभूत ठरले आहेत. उगाच सावरकरांचा अपमान केला नसता तर भाजपा-शिवसेनेला त्यांची महती, गुणगान गाण्याची संधीच मिळाली नसती. त्यामुळे राज्यातील सत्ताधार्‍यांना विनाकारण सावरकरांचा मुद्दा उपस्थित करण्याची संधी मिळवून दिल्याबद्दल राहुल गांधींनाच मनःपूर्वक धन्यवाद दिले पाहिजे.

स्वातंत्र्यवीर Savarkar सावरकर कोण हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. पण पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणार्‍या राहुल गांधी यांना त्यांचे गुण माहीत असू नयेत, याला अज्ञान म्हणावे की जाणूनबुजून त्यांनी डोळे आणि कान मिटून घेत सावरकरांची महती आपल्यापर्यंत येण्यापासून रोखली आहे, हे कळायला मार्ग नाही. महाराष्ट्राने जसे शिवरायांवर प्रेम केले, आंबेडकरांच्या नेतृत्वात तयार झालेली राज्यघटना डोक्यावर घेतली, जोतिबा फुलेंची समाजपरिवर्तनाची चळवळ मान्य केली, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अहिंसेचे व्रत स्वीकारले; तद्वतच येथील जनतेने सावरकरांना स्वातंत्र्यवीर पदवी बहाल करीत त्यांचे मोठेपणही मान्य केले आहे. सावरकर कोण हे जाणून घ्यायचे असेल तर अटलबिहारी वाजपेयी यांचे त्यांच्यावरील भाषण एकदा तरी या देशातील प्रत्येक व्यक्तीने ऐकले पाहिजे. अटलबिहारी वाजपेयी म्हणतात, सावरकर म्हणजे तेज, त्याग, तप, तत्त्व, तर्क, तारुण्य, तीर, तलवार, तळमळ. ते पुढे असेही म्हणतात, सावरकर म्हणजे तळमळणारा आत्मा, तितीक्षा, तिखटपणा तसेच सावरकर म्हणजे बहुरंगी व्यक्तित्व. पण राहुल गांधींना हे साफ अमान्य आहे, त्यांना सावरकरांची काळकोठडी म्हणजे राजकीय कैद्यांना दिली जाणारी साधारण कैदेची शिक्षा वाटते. त्यांना सावरकरांचे काव्य मान्य नाही, त्यांना सावरकरांचे सामाजिक काम मान्य नाही, त्यांना त्यांचे सामाजिक पुढारलेपण मान्य नाही.

कोणत्या मातीत जन्म घेतला राहुल गांधी तुम्ही? अहो जसे शिवाजीचे नाव घेतले की, अवघ्या देशवासीयांच्या मनात मोगलांविषयी तिटकारा निर्माण होतो, त्यांनी येथील जनतेवर केलेले अनन्वित अत्याचार डोळ्यांपुढे येतात आणि शिवाजी जसे गनिमीकाव्याने लढले तसाच युद्धसंचार अंगात होऊन, हात शत्रूच्या गळ्याचा घोट घेण्यासाठी शिवशिवू लागतात तसेच सावरकरांबाबत आहे. सावरकर म्हणजे कोणी एखादी व्यक्ती नव्हे! तो एक धगधगती जाज्वल्य विचार आहे. त्या विचारांत आपल्याच घरावर तुळशीपत्र ठेवून देशासाठी जगण्या-मरण्याची ताकद मिळते. Savarkar सावरकरांचे नाव घेताच देशभक्तीचे स्फुल्लिंग जागृत झाल्याशिवाय राहात नाही. दोन जन्मठेपेच्या शिक्षा भोगताना इंग्रजांनी त्यांच्यावर केलेले अनन्वित अत्याचार डोळ्यांपुढे उभे ठाकतात. अंदमानच्या काळकोठडीत कोलू ओढताना इंग्रज अधिकार्‍यांनी शरीरावर मारलेल्या चाबकाच्या आवाजाने मन विषण्ण होऊन जाते. इतके सारे होऊनही ही व्यक्ती काळकोठडीतून बाहेर पडल्यावर पुन्हा समाजसेवेत रुजू होते. अहो राहुल गांधी, कुठल्या शाळेत शिकलात तुम्ही? कोण होते तुमचे शिक्षक? की, त्यांचाही मेंदू रिकामा होता? अहो आपल्या आजीने, हो! इंदिरा गांधींनीसुद्धा वीर सावरकरांच्या मृत्यूनंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना ‘साहस आणि देशभक्तीचे दुसरे नाव म्हणजे सावरकर’ अशी भावपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केली होती. किमान आजीच्या या भावनांची तरी तुम्हाला आठवण असायला हवी होती. अजूनही कोणी सांगितले नसेल तर महाराष्ट्रातील बच्चासुद्धा तुम्हाला सावरकर कोण होते, हे सांगू शकेल. एकदा जाणून घ्या त्यांनी, त्यांच्या बंधूंनी आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी कोणत्या यातना सहन केल्या ते!

Savarkar वीर सावरकरांनीच राष्ट्रध्वज तिरंग्याच्या मध्यभागी धर्मचक्र अंकित करण्याची सूचना सर्वप्रथम केली होती; जी डॉ. राजेन्द्र प्रसाद यांनी मान्य केली. देशाच्या सर्वांगीण विकासाचे चिंतन करणारे ते पहिले क्रांतिकारी होते. काळ्या पाण्याची शिक्षा भोगून परतल्यानंतर त्यांनी समाजातील अस्पृश्यता आणि हिंदू धर्मातील कुप्रथांविरुद्ध आवाज उठवला. जगातील ते पहिले कवी होते, ज्यांनी अंदमानातील एकांतवासात कारागृहाच्या भिंतींवर खिळे आणि कोळशाचा वापर करून कविता लिहिल्या आणि त्या कंठस्थ केल्या. या प्रकारे पाठांतर केलेल्या 10 हजार ओळी त्यांनी कारागृहातून सुटका झाल्यानंतर लिहून काढल्या. हा सारा इतिहास आता सावरकर गौरव यात्रेच्या निमित्ताने उजागर होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सावरकरांच्या अनेक गुणवैशिष्ट्यांवर प्रकाश टाकण्यात आला. त्यांचे देशासाठीचे योगदान बहुमूल्य असल्याचे नमूद करण्यात आले. आज ज्या स्वातंत्र्याचा राहुल गांधी उपभोग घेत आहेत, त्यामागे सावरकरांचे कष्ट आहेत, ही बाब स्पष्ट करून त्यांचा वारंवार अपमान करणार्‍या राहुल गांधी यांनाच एक दिवस अंदमानच्या तुरुंगात पाठविले पाहिजे, अशी टिप्पणी करीत मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांचा निषेध केला आहे.

राहुल गांधींना ‘स्क्रिप्ट’ कोण लिहून देतो, हेसुद्धा एकदा बघायला हवे. कारण त्यांच्या जवळचे असलेले काँग्रेसी नेतेसुद्धा सावरकरांचा एवढा अपमान करायला धजणार नाहीत. त्यांच्याही मनात सावरकरांबद्दल प्रचंड आदर आहे. महाराष्ट्रातील यच्चयावत सार्‍याच राजकीय पक्षांच्या नेत्यांना, कलाकारांना, सामाजिक पुढार्‍यांना, साहित्यिकांना, जाणत्यांना सावरकरांनी आपल्या कृतीची, विचारांची मोहिनी घातली आहे. सावरकरांच्या अंत्ययात्रेला तब्बल सात लाख लोक उपस्थित होते; यावरून त्यांच्या जनमानसातील लोकप्रियतेची कल्पना यावी. वयाच्या सोळाव्या वर्षी या मुलाने देवीसमोर दिव्यावर हात ठेवून शपथ घेतली की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन! Savarkar सावरकरांचे साहित्यातील योगदानही विसरता न येण्यासारखे आहे. त्यांनी जशी पुस्तके लिहिली तशाच अजरामर कविताही लिहिल्या. आजही त्यांच्या कवितांनी देशभक्तीचा जागर होतो, राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतविले जाते. सावरकरांनी विदेशी कापडांची होळी केली. क्रांतिकारकांची संघटना स्थापन करून अनेक क्रांतिकारकांना घडविले. अभिनव भारत ही तरुणांची गुप्त संघटना त्यांच्याच डोक्यातून निघालेली कल्पना. त्यांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या होत्या. पण ते इंग्रजांना म्हणाले होते की, तोवर तुमचे राज्यच राहणार नाही आणि तसेच झालेदेखील! रस्त्यांवरील नमाजाविरुद्ध महाआरत्यांच्या सुरू झालेल्या उपक्रमामागे सावरकरांच्याच विचारांची प्रेरणा आहे. अंदमानच्या जेलमध्ये मुसलमान कैदी हिंदू कैद्यांचे धर्मपरिवर्तन करीत, ते सावरकरांनी थांबविले. त्यांनी शेकडो मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. सावरकर गौरव यात्रेच्या निमित्ताने त्यांचे सुधारणावादी विचार घरोघरी पोहोचावे, त्यांच्यावरील पुस्तके ठिकठिकाणी वितरित व्हावी, त्यांच्यावरील चित्रपटांचे जाहीर प्रदर्शन व्हावे, ‘मी सावरकर’ अशा वेषभूषा स्पर्धा व्हाव्या, त्यांच्या कवितांचे जाहीर पठण व्हावे आणि सावरकर विचार मनोमनी रुजावा, या शुभेच्छा!