तरुण भारत लाईव्ह | १६ डिसेंबर २०२२ | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर, जवळपास सर्वच बँकांनी कर्जाचे व्याजदर वाढवले आहेत. याच बँकांच्या यादीत आता एसबीआयचा (SBI) ही समावेश झाला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं १५ डिसेंबर २०२२ पासून गृहकर्जाचे दर वाढवले आहेत. बँकेनं गृहकर्जाच्या व्याजदरात ०.३५ टक्के वाढ करत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न महागणार आहे. या व्याजदर वाढीमुळे आधी कर्ज घेतलेला ईएमआयचा हप्ता देखील वाढणार आहे.
जर तुमचं होम लोन सुरू असेल आणि तुम्ही सध्या कर्जाचे हफ्ते भरत असाल, तर तुम्हालाही आजपासून पुढच्या कर्जाच्या हफ्त्यांसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. जर तुम्ही पूर्वी ८.४० टक्के दरानं २० वर्षांसाठी ३० लाख रुपयांचं गृहकर्ज घेतलं असेल, तर आता तुम्हाला त्यावर अधिक ईएमआय भरावा लागणार आहे. एसबीआयच्या वेबसाईटनुसार, गृहकर्जासाठी वेगवेगळ्या कालावधीच्या कर्जाचे व्याजदर ८ टक्के ते ८.६० टक्के आहेत. पूर्वी ते ७.७५ टक्के ते ८.३५ टक्के होते. ऑटो, गृह आणि वैयक्तिक कर्ज यांसारख्या बँकेचे बहुतेक कर्ज व्याजदर यावर आधारित आहेत.
जर सध्याच्या SBI ग्राहकानं ८.४० टक्के व्याजदरानं ३० लाख रुपयांचं गृहकर्ज घेतलं असेल, तर आता कर्जावरील वाढीनंतर, व्याज दर ८.७५ टक्के (विशेष सवलती अंतर्गत ०.१५ टक्के सवलतीसह) लागू झाला आहे. म्हणजेच, आता या नवीन दरांनुसार गृहकर्जाचे हफ्ते निश्चित केले जाणार आहेत. म्हणजेच, ३० लाख रुपयांच्या रकमेसाठी एचख ८.४० टक्के व्याज दरानं २५,८४५ रुपये झाले. आता नवीन दरांनुसार, ईएमआय २६५११ रुपये होईल. म्हणजेच आता तुम्हाला दर महिन्याला ६६६ रुपये जास्त द्यावे लागणार आहेत.