---Advertisement---
Women’s ODI World Cup 2025 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. स्पर्धेचे यजमानपद भारत आणि श्रीलंकाकडे असून, विश्वचषक स्पर्धा ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. भारताचा पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध बेंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे. विशेषतः तणावानंतर भारत-पाकिस्तान पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहे.
या स्पर्धेत भारताचा सामना ५ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानशी होईल. हा सामना कोलंबोमध्ये खेळला जाईल. २०१३ नंतर पहिल्यांदाच भारतात महिला एकदिवसीय विश्वचषक आयोजित केला जात आहे. यात ८ संघ सहभागी होत असून, या स्पर्धेचा अंतिम सामना २ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. याशिवाय, पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत खेळले जातील.
भारतात खेळणार नाही पाकिस्तान
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षात घेता, पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत खेळले जातील. ५ ऑक्टोबर रोजी टीम इंडिया कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर पाकिस्तानशी सामना करेल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांच्यातील हायब्रिड मॉडेलवरील करारानुसार, विश्वचषकादरम्यान पाकिस्तान त्यांचे सर्व सामने कोलंबोमध्ये खेळेल. या वर्षाच्या सुरुवातीला भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने पाकिस्तानऐवजी दुबईमध्ये खेळले. याला उत्तर देताना पीसीबीने म्हटले होते की, पाकिस्तान भविष्यात भारतात कोणताही सामना खेळणार नाही.