स्कुल बसचा अपघात; 30 हून अधिक विद्यार्थी जखमी

तरुण भारत लाईव्ह । ३१ मार्च २०२३। जामनेर तालुक्यात 30 हून अधिक विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या स्कुल बसचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात 30 हून अधिक विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी घटना घडली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पहुर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शेंदुर्णी येथील सरस्वती विद्यामंदिर शाळेची बस ही सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना घेऊन शाळेकडे निघाली होती. याचवेळी पहुर-शेंदुर्णी दरम्यान बसचे स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस रस्त्यावर पलटली. शाळेपासून पाच किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. यावेळी बसमध्ये 30 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक प्रवास करत होते. बस पलटल्याने सर्व जण जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुखापत झाली नाही.

अपघात घडताच स्थानिक रहिवासी तात्काळ धावत आले. स्थानिकांनी बसमधील विद्यार्थी, शिक्षकांना बाहेर काढून खाजगी वाहनातून रुग्णालयात नेले. पहूर पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पहूर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.