जळगाव : बसमध्ये प्रवासी चढत असतानाच वाहकाने बेल दाबल्याने बस चालू होऊन प्रवाशांचा जीव टांगणीला लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे हा प्रकार घडला. सुदैवाने प्रवाशांच्या समयसूचकतेने होणारा अपघात टळला.
पातोंडा (ता. अमळनेर) येथे बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास यावल आगाराची पिंपळनेर ते यावल बस क्र.एम.एच २०,बी.एल.१४२५ पातोंडा येथे आली होती. पातोंडा येथील शालेय विद्यार्थी व प्रवासी पत्रकार सागर मोरे हे चढत असताना त्यांचा एक पाय बसमधील शेवटच्या पायरीवर व एक पाय जमिनीवर असताना बसचे वाहक एस.आर.जाधव यांनी डबल वेल वाजवली आणि चालकाने गाडी पुढे नेली. त्यात प्रवासी मोरे यांची भंबेरी उडाली. चालू गाडीत ते काही सेकंद तसेच लटकून होते. हे सर्व घडत असताना वाहकाने व चालकाने गाडी थांबविण्याची तसदी घेतली नाही.
या प्रकारात मोरेंचा अपघात होताना वाचला. हा प्रकार पाहून ग्रामस्थ जमा होऊन वाहाकाला गाडी थांबवायला सांगितले तरीही वाहकाने गाडी थांबवली नाही. गाडीत शिरल्यावर बसमधील आतील भाग हा पूर्ण खाली होता. प्रवासी ज्याच्या त्याच्या सीटवर बसले होते. प्रवाशांना उभे राहण्यासाठी पुरेपूर जागा असताना देखील तुम्ही प्रवासी चढत असताना डबल बेल वाजवून गाडी का सुरू केली ? याचा जाब विचारल्यावर वाहकाने आम्हाला गाडीत जास्त प्रवासी नेण्याची परवानगी अथवा नियम नाही आहे. आम्ही जास्त प्रवाशांना घेत नाहीत असे अजब उत्तर देऊन उर्मटपणा दाखविला आणि तुम्ही कुठेही जा, काय करायचे करा आमचे काहीही नाही होणार असे देखील वाहकाने सांगितले.
दरम्यान, पातोंडा येथे वारंवार विद्यार्थी व प्रवासीबाबत चालक व वाहक यांच्या मनमानीपणा व गैर वर्तणुकीचे प्रकार घडत आहेत. जर एखादा वृद्ध प्रवासी असता तर अपघात झाल्यावाचून राहिला नसता. याबाबत पत्रकार मोरे यांनी जळगाव विभागाचे वाहतूक नियंत्रक भगवान जगनोर व यावल आगाराचे व्यवस्थापक दिपक महाजन यांच्याकडे दूरध्वनीवरून तक्रार केली. त्यांनी याबाबत लेखी तक्रार देण्याचे सांगून कार्यवाही करण्याचे सांगितले.
सभ्यतेचे धडे द्यावेत : मोरे
या संदर्भात सागर मोरे म्हणाले की, पातोंडा येथे विद्यार्थी व प्रवाशांसोबत अशा घटना वारंवार घडत आहेत. विद्यार्थी व प्रवासी फुकट प्रवास करत नाहीत. प्रवासी आहेत तर एस.टी.आहे हे कर्मचार्यांनी लक्षात घ्यावे. चालक व वाहकांना सभ्य वागणुकीचे धडे द्यावेत अन्यथा पातोंडा येथील प्रवासी व ग्रामस्थ रस्त्यावर येऊन एकही बस धावू देणार नाहीत.