Yuvraj Koli Murder Case : जळगाव : तालुक्यातील कानसवाडा येथे पूर्व वैमनस्यातून शुक्रवारी सकाळी आठ वाजता (शिंदे गट) माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी (३६) यांची गावातील तिघांनी धारदार शस्त्राने वार करीत हत्या केली होती. या गुन्ह्यात प्रमुख संशयीताला अटक करण्यात आल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी दुसरा संशयीत परेश उर्फ सोनू भरत पाटील यास अटक केली आहे.
कानसवाडी गावातील तिघांनी शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शिवसेनेचे (शिंदे गट) माजी उपसरपंच युवराज कोळी यांची ग्रामपंचायतीच्या जुन्या वादातून चाकू व चॉपरचे वार करीत हत्या केली होती. ही घटना कानसवाडा शिवारातील शेत गट क्रमांक १३५ मध्ये घडली होती. खुनानंतर संशयीत पसार झाले होते तर मृत कोळी यांचा मृतदेह जळगाव शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला होता.
ही कारवाई भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.सी. मनोरे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र तायडे, हवालदार शरद भालेराव, प्रशांत विनारे, कॉन्स्टेबल रुपेश साळवे, सागर बिडे आदींच्या पथकाने केली.
तीन आरोपींविरोधात गुन्हा
युवराज कोळी यांच्या खून प्रकरणी सोपान रामकृष्ण कोळी (७४, कानसवाडा) यांच्या फिर्यादीवरून संशयीत परेश भरत पाटील, भास्कर पाटील, देवेंद्र (देवा) भरत पाटील (सर्व रा.शेळगाव, ता. जळगाव) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान गुन्हे शाखेने भरत पाटील यास अटक केल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी दुसरा संशयीत परेश उर्फ सोनू भरत पाटील यास अटक केली आहे.