भाजपा उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता, महाराष्ट्रातून २५ नावांवर शिक्कामोर्तब!

नवी दिल्ली : महाराष्ट्रात महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटला नसताना देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक बोर्डाची दिल्लीत बैठक सुरू आहे. या बैठकीत २०१९ मध्ये भाजपने जिंकलेल्या २३ आणि हरलेल्या २ जागांची चर्चा करण्यात आली. यामध्ये काही जागांवर उमेदवारांची नावं शॉर्टलिस्ट करण्यात आले आहेत. दरम्यान, भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, पक्षाचे अध्यक्ष जे.पी नड्डासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्राच्या जागांवरही चर्चा झाली असून महाराष्ट्राच्या २५ जागांसह भाजपा उमेदवारांची दुसरी यादी आज घोषित होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या जागावाटपाच्या बैठका सुरु आहेत. दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय निवडणूक बोर्डाची दिल्लीत बैठक सुरू आहे. या बैठकीत २०१९ मध्ये भाजपने जिंकलेल्या २३ आणि हरलेल्या २ जागांची चर्चा करण्यात आली. यामध्ये काही जागांवर उमेदवारांची नावं शॉर्टलिस्ट करण्यात आले आहेत. या बैठकीत काही नाव सीईसीकडे पाठवल्याची विश्वसनीय नेत्यांची माहिती असून यात नागपूर मधून नितीन गडकरी, जालनामधून रावसाहेब दानवे, चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार, पुणे – मुरलीधर मोहोळ, सांगली – संजयकाका पाटील, भिवंडी – कपिल पाटील, दिंडोरी – भारती पवार, बीड – पंकजा मुंडे यांचे नाव निश्चित करण्यात आले असल्याचे कळते.

याआधी भाजपाने १९५ उमेदवारांची पहिली यादी घोषित केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आज दुसरी उमेदवारी यादी जाहीर करू शकते. माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा या राज्यांमधील जागांवर चर्चा करण्यात आली. त्यामुळे आज किंवा उद्यापर्यंत भाजपा लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपाने अद्याप महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब, ओडिशा, तामिळनाडूसारख्या राज्यांमधील एकही उमेदवार जाहीर केले नाहीत. बिहारमध्ये जागावाटपावरून अद्याप चर्चा सुरू आहे. पंजाबमध्ये अकाली दलासोबत तर महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे.