Security Alert for Kashmir: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे दहशतवादाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अश्यात काशीरामध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला होऊ शकतो असा अलर्ट गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. लष्कर-ए-तोयबा हा हल्ला घडवून आणू शकते असा अंदाज आहे. त्यानुसार दक्षिण काश्मीर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. याठिकाणच्या पर्यटन स्थळांना दहशतवादी लक्ष्य बनवू शकतात. अशा परिस्थितीत, सुरक्षा संस्थांना पर्यटन स्थळांची सुरक्षा वाढविण्याचा सल्ला दिला आहे.
गुप्तचर यंत्रणेच्या इशाऱ्यानंतर भारतीय लष्कर आणि सुरक्षा दल सतर्क झाले असून आवश्यक त्या जागी तैनात करण्यात आले आहे. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार दहशतवादी गट येत्या काही दिवसांत स्थानिक नसलेल्या, अल्पसंख्याक काश्मिरी पंडित समुदायाच्या लोकांना आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना किंवा पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या दृष्टीने योजना आखत आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या प्रत्येक कोपऱ्यात सुरक्षा कर्मचारी तैनात
पहलगाम येथे भ्याड हल्ला करत दहशतवाद्यानी २६ जणांचा जीव घेतला. या हल्ल्यात ५ ते ७ दहशतवाद्यांचा सहभाग असून ते स्थानिक असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या पार्शवभूमीवर संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच लष्कराकडून सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. या सर्च ऑपरेशन दरम्यान संशयास्पद वस्तू सापडलेल्या अनेक दहशतवाद्यांची घरेही उद्ध्वस्त करण्यात आली आहे.
भारताचे पाकिस्तानबाबत अनेक कठोर निर्णय
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. भारताने पाकिस्तानबाबत अनेक कठोर निर्णय घेतले आहेत जसे की सिंधू पाणी करार रद्द करणे. प्रत्युत्तरात, पाकिस्ताननेही शिमला करार रद्द केला आहे. याशिवाय अटारी आणि वाघा सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता दोन्ही देशांमधील कोणत्याही प्रकारचा थेट व्यापार शक्य नाही.
तरीही २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर आणि जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर दोन्ही देशांमधील थेट व्यापार जवळजवळ बंद झाला होता. भारताने पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर २०० टक्के कर लादला होता आणि त्यांचा ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ (MFN) दर्जा काढून घेतला होता. पाकिस्तानने भारतासोबतचा सर्व द्विपक्षीय व्यापारही स्थगित करण्याची घोषणा केली होती. पण सध्या या दोन्ही देशांमधील व्यापार तिसऱ्या देशामार्फत होतो.