अवैध वाळूचे जप्त ट्रॅक्टर तहसिल आवरातून पळविले, कर्मचारी बघत राहिले अन् मग…

पाचोरा : येथील तहसिल आवरातील अवैध वाळूचे जप्त केलेले ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्या आरोपी चालकास पाचोरा पोलिसांनी शनिवारी अटक केली. सूरज भरत पाटील (रा.जारगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पाचोरा तहसील आवारात अवैध वाळूचे जप्त केलेले ट्रॅक्टर मागील गेटने विनापरवानगी बळजबरीने चोरून नेण्याची घटना दि.२६ जून सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास घडली. हा प्रकार तहसील कार्यालयात नाईट ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यासमोरच घडला. त्याने ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपितांनी शिवीगाळ दमदाटी करून ट्रॅक्टरची धडक देऊन चालक ट्रॅक्टरसह पसार झाला होता.

या घटने प्रकरणी त्याच रात्री ११:३० पाचोरा पोलिसांत शिपाई गोपीचंद महाजन यांनी दिलेल्या फिर्याद वरून ट्रॅक्टर चालक आरोपी सूरज भरत पाटील (रा.जारगाव)व एक अज्ञात अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके करीत आहे.