घोषणाबाजी करत अंगावर डिझेल ओतल अन्.., प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच आत्मदहनाचा प्रयत्न!

धुळे: शहरातील चितोड रोड मिल परिसरातील नागरिकांनी आज २६ रोजी सकाळी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. विशेष, प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ध्वजारोहण झाल्यानंतर हा प्रकार घडला.

आत्मदहनाचा प्रयत्न का?

शहरातील चितोड रोड मिल परिसरातील नागरिक तुळसाबाईचा मळा या ठिकाणी गेल्या ३५ ते ४० वर्षापासून राहत आहेत. ते राहत असलेल्या घरांचा हक्काचा सातबारा मिळावा, यासाठी धुळे जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त व भूमि अभिलेख कार्यालयाकडे सातत्याने मागणी लावून धरली होती. मात्र प्रशासनाने त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने या नागरिकांनी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकार्यालयावर आत्मदहनाचा इशारा दिला होता.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण झाल्यानंतर मिल परिसरातील नागरिकांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर येत घोषणाबाजी करत स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना अडवले व त्यांच्याकडील डिझेलच्या बाटल्या हिसकवण्याचा प्रयत्न केला.

आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात 

कार्यालयाबाहेरील काही काही आंदोलकांनी स्वतःच्या अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला यावेळी त्यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सर्व आंदोलनकर्त्यांना धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.