मुंबई : अनेक खवय्ये हॉटेलमध्ये जावून चिकनवर ताव मारतात. मात्र तुम्ही खात असलेलं मांस खरचं चिकन आहे का? याची खातरजमा केली पाहिजे कारण हॉटेल्समध्ये चिकन म्हणून कबुतरांच्या मांसची विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईमधील या प्रकरणामध्ये आठ व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरेश गागलानी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शीव (सायन) येथील एका गृहनिर्माण संस्थेमध्ये राहणारा अभिषेक सावंत हा लहान कबुतरं पाळायचा आणि नंतर ती मोठी झाल्यावर त्यांना मारुन मांस जवळच्या हॉटेल आणि बियर बारमध्ये विकायचा. हॉटेलवालेही हे मांस नक्की कशाचं आहे याची चाचपणी न करता ते कोंबडीचं मांस म्हणू विकायचे. या वर्षी मार्च महिन्यापासून अभिषेकने हा उद्योग सुरु केला होता. गागलानी यांनी अभिषेकविरोधात केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून पुरावेही असल्याचं म्हटलं आहे.
गागलानी यांच्या तक्रारीच्या आधारावर आयपीसी कलम ४२८ आणि ४४७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेकने गागलानी यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहे. गागलानी यांनी यापूर्वीही शेजारच्या सोसायटीमधील सदस्यांबद्दलही खोटे आरोप केल्याचा दावा अभिषेकने केला आहे. या प्रकरणामध्ये अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.