---Advertisement---
मुंबई : लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. हरी नरके यांचे आज सकाळी निधन झाले. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्यही राहिले आहेत. ओबीसींच्या प्रश्नांवर त्यांचा मोठा अभ्यास होता.
महाराष्ट्र शासनाने ‘समग्र महात्मा फुले’ नावाचा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला. त्याचे हरी नरके संपादक होते. डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने २६ खंड प्रकाशित केले, त्यातील सहा खंडांचे संपादन हरी नरके यांनी केले होते. महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन आणि महात्मा फुले- शोधाच्या नव्या वाटा ही दोन पुस्तके त्यांची लोकप्रिय होती.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री बाई फुले यांच्याविषयी हरी नरके यांनी समग्र लिखाण केलं. महात्मा फुले साहित्याचा अभ्यास आणि संशोधन करणारे संशोधक म्हणून ते उभ्या महाराष्ट्राला सुपरिचित होते. महात्मा फुले यांचे साहित्य प्रकाशित करण्यात हरी नरके यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या निधनामुळे संशोधन, सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
सकाळी मुंबईला येत असताना सहा वाजता गाडीत त्यांना दोन वेळा उलट्या झाल्या. त्यानंतर एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती हरी नरके यांचे निकटवर्तीय मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.