मुंबई : जागतिक बाजारांमध्ये सकारात्मक परिस्थिती आणि विदेशी गुंतवणूकदारांमधील उत्साह कायम राहिल्याने बीएसई सेन्सेक्स प्रथमच नवी ६३,००० ची उंची गाठली आहे. शेअर बाजाराची घाडदौड अशीच काय राहण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. विदेशातील ब्रोकरेट फर्म मॉर्गन स्टॅनले यांनी सेन्सेक्स डिसेंबर २०२३ पर्यंत ८० हजाराच्या अंकांची पातळी गाठणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे.
अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण समितीने व्याजदरातील वाढीचे चक्र मंदावण्याच्या दिलेल्या संकेतामुळे गुंतवणूकदारांनी बाजारात चौफेर समभाग खरेदी सुरू ठेवली आहे. विदेशी संस्थांकडून करण्यात आलेल्या गुंतवणुकीमुळे देशातील भांडवली बाजारांचा प्रवास मजबूत राहिल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे चीनमधील करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल होण्याच्या वृत्ताने जागतिक बाजारपेठांना दिलासा मिळाला असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
पुढील १२ महिन्याच्या काळात भारतीय शेअरबाजारात जागतिक स्तरावर गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची शक्यता ब्रोकरेट फर्म मॉर्गन स्टॅनले यांनी व्यक्त केली आहे. ग्लोबल बाँड निर्देशांकात भारताचा समावेश करण्यात आल्यास पुढील वर्षी अखेर सेन्सेक्स निर्देशांक ८० हजार अंकांपर्यंत मजल मारु शकतो, असा अंदाज फर्मने वर्तवला आहे.