चाळीसगाव : चाळीसगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्ग क्रमांक २११ वर रांजणगाव फाट्याजवळ रविवारी (१९ जानेवारी) दुपारी दोन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. दुचाकी व भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी (कुझर) वाहनाच्या धडकेत चंदाबाई मलखान पवार (रा. कोंगानगर, ता. चाळीसगाव) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
चाळीसगाव तालुक्यातील खेडें तांडा येथील कृष्णा संजय जाधव (१९) आपल्या आजी चंदाबाई पवार यांना दुचाकीवरून (एमएच १९, एएस ८४७३) चाळीसगावकडे घेऊन येत होता. रांजणगाव फाट्यावर भरधाव वेगाने चाळीसगावकडून संभाजीनगरकडे जात असलेल्या चारचाकी वाहनाने (एमएच २०, सीएच ६५२२) दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर चारचाकी रस्त्यावर उलटली.
या अपघातात चंदाबाई पवार यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी चालक कृष्णा जाधव यासह चारचाकीतील चालक आणि प्रवासी असे पाच जण जखमी झाले. सर्व जखमींवर चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्यात आली. रस्त्यावरील वाहनांच्या वाढत्या वेगामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रशासनाकडून कठोर उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे.