नंदुरबार : शहरात २७ एप्रिल रोजी अखिल भारतीय दिगंबर जैन महासभेचे अध्यक्ष स्व.निर्मलकुमार सेठी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त जैन धरोहर दिवस पाळण्यात आला.
शहरातील माणिक चौका जवळील अजितनाथ दिगंबर जैन मंदिर प्रांगणात प्रवचन व धार्मिक उपक्रम झाले. दिगंबर जैन तीर्थरक्षा एक काळाची गरज असल्याचे सरीता जैन यांनी सांगितले.
आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत स्व. निर्मलकुमार जैन यांनी सर्व जैन तीर्थक्षेत्राचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले. म्हणून त्यांच्या स्मृतीत या दिवसाचे संपूर्ण भारतभर दिगंबर जैन समाजात महत्त्व असून तीर्थक्षेत्र मंदिर संरक्षणाच्या विषयावर विचार मंथन करण्यात येते. त्या अनुषंगाने श्रीक्षेत्र भामेर येथील मंदिरावर सकाळी आठ वाजता राहुल पाटोदी, संजय झांझरी, गणेश माळी आणि जैन समाज बांधवांनी स्वच्छता अभियान राबविले. त्यानंतर रात्री आठ वाजता नंदुरबार येथील दिगंबर जैन मंदिर परिसरात प्रवचनाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी स्व. निर्मलकुमार जैन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. सुरेश जैन यांनी प्रास्ताविक मांडले. सरीता झांझरी, महेंद्र झांझरी, पुनम जैन, नुपुर दीदी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पदम जैन यांनी आभार मानले.