पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या सात इमारती; पहा धक्कादायक व्हिडीओ

कुल्लू : हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे गेल्या दोन दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे. या पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झालं आहे. आजही कुल्लू येथे भुस्खलन झाल्याने अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळतानाचा व्हिडिओ कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. या दुर्घटनेत असंख्य मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत लोक आक्रोश करताना दिसत आहेत.

हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. कुल्लूच्या आनी उपमंडल येथे भुस्खलन झालं आहे. या भुस्खलनात एकापाठोपाठ एक अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. कुल्लू जिल्ह्यातील आनी बस स्टँडजवळच ही दुर्घटना घडली आहे. सकाळी 9 वाजून 40 मिनिटांनी ही घटना घडली. एकूण 7 इमारती जमीनदोस्त झाल्याचं सांगण्यात आलं.

काय आहे व्हिडीओमध्ये
भुस्खलन होताच झाडही हलताना दिसत आहे. त्यानंतर पाहता पाहता इमारती धसायला सुरुवात होताना दिसत आहे. अन् पापणी लवते न लवते तोच इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना दिसत आहे. त्यानंतर घटनास्थळी धुळीचे लोळच लोळ दिसत आहेत. त्यामुळे काही दिसेनासे होते. हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक वाटतं. काही लोकांनी या घटनेचा व्हिडीओ तयार केला आहे.

हिमाचल प्रदेशात गेल्या 72 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काल बुधवारीही या भागात भुस्खलन झाल्याने 11 लोकांचा मृत्यू झाला होता. आजही या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.