---Advertisement---
जळगाव : मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने सात जणांनी तिघांना बेदम मारहाण केली. ही घटना अमळनेर तालुक्यातील एका गावात घडली असून याप्रकरणी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
फिर्यादी हे कामानिमित्त बडोदा येथे एकटे राहत असून अमळनेर तालुक्यातील एका गावात त्यांची पत्नी दोन्ही मुलीसह राहते. फिर्यादीस त्याच्या पत्नीचा फोन आला की, त्यांची १५ वर्षीय मुलगी घरात लहान बहिणीसोबत असताना हितेश मिलिंद साळुंखे याने घरात घुसून तिची छेड काढली. त्यामुळे फिर्यादी लगेच गावाकडे निघून ११ रोजी गावी पोहचले.
सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते घराजवळ एकटेच उभे असताना मिलिंद साळुंखे, हितेश मिलिंद साळुंखे, मनिषा मिलिंद साळुंखे, ललिता फकिरा थोरात, सीमा पवार, अशोक छगन थोरात, जिजाबाई अशोक थोरात हे जमा झाले. मिलिंद याने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर मारत त्याला दगड विटांनी मारहाण सुरू केली. फिर्यादीच्या पत्नी वाचवण्यास आली असता तिलाही मारहाण करण्यात आली.
एक गंभीर जखमी
फिर्यादीच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्याच्यावर धुळे येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणात अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आल्याने पॉक्सोचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दवाखान्यात दिलेल्या जबाबावरून पोलिसांत सात जणांविरुद्ध पॉक्सोसह अन्य कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय विनोद पवार करीत आहेत.