---Advertisement---
जळगाव : जळगाव जिल्ह्यात विविध घटनांत तब्बल सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोन महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सर्पदंशाने विवाहितेचा मृत्यू
जामनेरच्या गोंडखेळ येथील जयश्री शरद मगर (३८) यांना मंगळवारी सकाळी सर्पदंश झाला होता. शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. अंगण स्वच्छ करीत असताना कोपऱ्यात ठेवलेली थैली उचलताच त्याखाली असलेल्या विषारी नागाने दंश केला होता. त्यांच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. पश्चात पती व २ मुले आहेत.
अपघातात गंभीर जखमीचा मृत्यू
चाळीसगावच्या बहाळ येथे दोन दिवसांपूर्वी एरंडोल-येवला महामार्गावर कार व दुचाकीत जबरदस्त अपघात झाला. त्या अपघातामध्ये जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. वासुदेव हरी वाणी (६४) हे दुचाकीवर जात होते. त्या दुचाकीला कारने धडक दिली. धुळे येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली.
म्हशी धुण्यासाठी गेलेल्याचा मृत्यू
जळगाव : तापी नदीच्या बॅक वॉटरमध्ये म्हशी धुण्यासाठी गेलेल्या देवानंद बाळू तायडे (३५, रा. तांदलवाडी, ता. रावेर) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रावेर तालुक्यातील तांदलवाडी शिवारात घडली. याप्रकरणी निंभोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रेल्वेतून पडून अनोळखीचा मृत्यू
जळगाव : धावत्या रेल्वेतून पडल्याने ३५ ते ४० वर्षीय अनोळखीचा मृत्यू झाला. ही घटना सावदानजीक अप रेल्वे मार्गावर खांब क्रमांक ४५८/१ ते ४५८/५ दरम्यान घडली. या प्रकरणी सावदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
जखमी पत्नीचा मृत्यू
जळगाव : कौटुंबिक वादातून पतीने कुन्हाडीने डोक्यात वार केल्यामुळे जखमी झालेल्या रेखा आनंदा धामोळे (रा. बोरनार, ता. जळगाव) या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कौटुंबिक वादातून आनंदा धामोळे यांनी मंगळवारी पत्नी रेखा यांच्या डोक्यात कुराडीने वार करून रेल्वेखाली आत्महत्या केली होती. या घटनेत रेखा धामोळे या गंभीर जखमी होत्या. सुरुवातीला त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात येऊन खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
तरुणाने घेतला गळफास
पाचोरा : पूनगाव रोडलागत असलेल्या आनंद नगर भागातील तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास घडली. अविनाश अशोक पवार (वय २४) या तरुणाने राहत्या घरी छताला दोरी लावून आत्महत्या केली. तत्काळ गल्लीतील मित्रांनी खासगी रुग्णालयात नेले असता त्यास मृत घोषित केले. तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या तरुणाची आई बाजार समिती यार्डात मोलमजुरी करते, वडील रोजंदारी करतात. हा युवक एका पेट्रोल पंपावर कामाला होता.
गच्चीवर गेला अन् संपविले जीवन
जळगाव : रात्री गच्चीवर जाऊन ऋषीकेश विजय न्हावी (२३, रा. ममुराबाद, ता. जळगाव) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश चिंचोरे करीत आहेत.