तातडीने कारवाई करा, अन्यथा… नशिराबादकर तीव्र आंदोलनाच्या तयारीत, काय आहे कारण?

---Advertisement---

 

नशिराबाद, प्रतिनिधी : येथील पेपर मिल कारखान्यातून सोडण्यात येणारे सांडपाणी व घातक द्रव्यांमुळे हवा व पाण्याची समस्या उद्भवत असून याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच वाघूर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.

नशिराबाद येथील गट क्र. ४९८मध्ये असलेल्या गायत्री पेपर मिल या कारखान्यातून तयार होणारे रासायनिक सांडपाणी व घातक द्रव्ये बेकायदेशीररित्या शोष खड्ड्यात सोडल्याची तक्रार स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

या सांडपाण्यामुळे परिसरातील विहिरी व भूजलाचे पाणी दूषित झाले आहे. हे पाणी पिण्यास व घरगुती वापरास अयोग्य झाले आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर, या पेपर मिलमध्ये ईटीपी (ईफ्लूंट ट्रिटमेंट ट्रिटमेंट) प्रणाली कार्यान्वित नाही, तसेच कारखान्यातून निघणाऱ्या दुर्गंधी व वायूसाठी स्क्रबर प्रणाली बसवलेली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधी व श्वसनास त्रास होत आहे.

यामुळे शेतमजूर, स्थानिक रहिवाशांचे आरोग्य, पिके, पिण्याचे पाणी व पर्यावरण धोक्यात आले आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या ठिकाणी तत्काळ तपासणी पथक पाठवून घटनास्थळाची पाहणी करावी, सांडपाणी, विहिरीचे पाणी व हवेचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत चाचणी करून प्रदूषणाचे प्रमाण तपासावे, तर पेपर मिलवर योग्य कायदेशीर व दंडात्मक कारवाई करावी, अशी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.

तीव्र आंदोलनाचा इशारा

या संदर्भात गावातील शेतकऱ्यांनी जळगाव येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच वाघूर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. या निवेदनावर शेतकरी भरत प्रकाश बोंडे, हेमंत नेहेते, अतुल चौधरी यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---